बच्चूभाऊंना जमले ते स्थानिकांना का नाही ?
By Admin | Updated: April 19, 2015 02:09 IST2015-04-19T02:09:27+5:302015-04-19T02:09:27+5:30
अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या प्रश्नांवर यवतमाळात येऊन केलेल्या आक्रमक आंदोलनाने येथील जनता चांगलीच प्रभावित झाली आहे.

बच्चूभाऊंना जमले ते स्थानिकांना का नाही ?
यवतमाळ : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या प्रश्नांवर यवतमाळात येऊन केलेल्या आक्रमक आंदोलनाने येथील जनता चांगलीच प्रभावित झाली आहे. १५० किलोमीटरवरील बच्चू कडूंना जे जमले ते एवढ्या वर्षात यवतमाळ जिल्ह्यातील एकाही आमदाराला का जमू नये, याची चर्चा आता जोर धरत आहे.
अपंग व्यक्ती हा समाजातील दुर्लक्षित घटक आहे. त्याला समाजातून मिळणाऱ्या हीन वागणुकीचा सामना करावा लागतो. शारीरिक व्यंगत्वावर बोट ठेवून त्यांचा अवमान केला जातो. समाजातून ही वागणूक असताना सरकारमधील घटक आणि शासकीय यंत्रणाही त्यांच्याशी सौजन्याने वागत नाही. त्यांचे कुणी वाली नाही, असे समजून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आरक्षित ठेवला जाणारा निधी इतर बाबींवर वळविला जातो. गेल्या दहा वर्षांपासून हा प्रकार राजरोसपणे शासकीय अभिलेख्यातून पाहायला मिळतो. मात्र त्याविरोधात कुणीही आवाज उठविला नाही. अपंगांच्या बाबतीत आघाडी सरकारमधील आमदारांचाच कित्ता युती सरकारमधील आमदार गिरवित आहेत. मात्र अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे अपक्ष आमदार तथा ‘प्रहार’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू मात्र १५० किलोमीटरवरील या अपंगांच्या मदतीला यवतमाळात धावून आले. शुक्रवारी कडू यांच्या नेतृत्त्वात अपंगांनी थेट जिल्हा परिषदेवर धडक दिली. सीईओंच्या कक्षाचा ताबा घेवून त्यांची खुर्ची टेबलवर ठेवत त्याला हार घातला गेला. नंतर उपस्थित झालेल्या सीईओंची झाडाझडती घेतली गेली. शेजारील जिल्ह्यातून येवून एखादा आमदार स्थानिक अपंगांच्या समस्यांना एवढ्या पोटतिडकीने आणि आक्रमकपणे प्रशासनापुढे मांडू शकतो, याचेच खरे अप्रुप जिल्ह्यातील जनतेला वाटते आहे. कारण त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या प्रश्नावर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराला एवढे आक्रमक होताना कधी पाहिले नाही. जिल्ह्यातील आमदार स्थानिकांच्याच समस्यांना हात घालत नाहीत तर खरंच दुसऱ्या जिल्ह्यातील समस्याग्रस्तांच्या मदतीला धावून जातील का, असा उपरोधिक सवाल जनतेतून विचारला जात आहे.
यापूर्वी १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. या पक्षातील सर्वच दिग्गज आणि व्हीआयपी असल्याने त्यांच्याकडून जनसामान्यांच्या प्रश्नांवर अशा आक्रमक आंदोलनाची जनतेनेही कधी अपेक्षा ठेवली नाही. एकतर ते कधी रस्त्यावरच उतरले नाही आणि एखादवेळी उतरले तरी ते प्रशासनाला निवेदन देण्यापुरते. विरोधी पक्षात असताना शिवसेना नेत्यांनी सुरुवातीला अशी चार-दोन आक्रमक आंदोलने केलीही, मात्र जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसल्यापासून त्यांचीही अशी आंदोलने जणू बंद झाली होती. आता तर भाजप-सेना सत्तेत असल्याने त्यांच्याकडून अशा आक्रमक आंदोलनाची अपेक्षा ठेवणे गैरच, तर दुसरीकडे विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुळात आंदोलनाची सवयच नाही, आक्रमक आंदोलन तर दूरच. जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक आंदोलनांबाबत नागरिकांचा अपेक्षाभंग झाला असला तरी बच्चू कडू यांच्या आंदोलनाने मात्र आशा पल्लवीत झाल्या आहेत. आंदोलनासाठी जिल्ह्यातीलच आमदार असणे गरजेचे नाही, शेजारील जिल्ह्यातील (जनतेच्या समस्यांची जाणीव असलेले) आमदारही आपल्या जिल्ह्यात येवून आक्रमक आंदोलनाचे नेतृत्त्व करू शकतात याची जाणीव स्थानिक जनतेला झाली आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेतील बच्चू कडूंच्या आंदोलनाने यवतमाळकर जनता ‘इम्प्रेस’ झाली आहे. त्याचवेळी स्थानिक आमदारांना एवढ्या वर्षात असे एकही आंदोलन का करता आले नाही, असा सवाल मात्र प्रत्येकच जण एकमेकांना विचारताना दिसतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)