महागावातील ३० हजारांवर शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार कोण ?
By Admin | Updated: March 14, 2015 02:19 IST2015-03-14T02:19:44+5:302015-03-14T02:19:44+5:30
खरिपात कोरडा दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेला रबी, अशा स्थितीत ३० हजार शेतकरी हतबल झाले आहेत.

महागावातील ३० हजारांवर शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार कोण ?
महागाव : खरिपात कोरडा दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केलेला रबी, अशा स्थितीत ३० हजार शेतकरी हतबल झाले आहेत. डोळ्यात आसवे आणून मदतीची प्रतीक्षा करीत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुडाणाला तर केंद्रीय दक्षता पथकाने तालुक्याची पाहणी केली. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदतीची फुटकी कवडीही मिळाली नाही.
महागाव तालुक्यातील मुडाणा येथे कोरड्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय दक्षता पथक आणि ४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुडाणा येथे येवून गेले. दोनही घटनेतील नेते आणि केंद्रातील दक्षता पथक खूप महत्त्वाचे आहे. या दोनही महत्त्वाच्या व्यक्तींकडून मुडाणा येथे पाहणी करण्यात आली. मात्र मुडाणा येथील शेतकऱ्यांची स्थिती जैसे थेच आहे. तिच स्थिती तालुक्यातील ३० हजार शेतकऱ्यांची आहे. या शेतकऱ्यांना आता नुसत्या भेटी नको तर ठोस मदतीची गरज आहे. सतत तीन हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेले. शेतकरी कसाबसा तग धरून आहे. अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या मुडाणा येथील शेतकरी गंगाप्रसाद खंदारे यांनी केंद्रीय दक्षता पथकासमोर मांडली होती. तीन एकरात एक क्विंटलही कापूस त्यांना झाला नव्हता. तिच गत तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. कमी पावसाचा फटका खरिपाला बसला. त्यामुळे सर्व भिस्त रबी हंगामावर होती. परंतु पीक काढणीला आले असताना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने तीन दिवस झोडपून काढले. हरभरा काळा पडला, ओंब्याने लदबदलेला गहू जमिनदोस्त झाला. फळपीक, भाजीपाल्याचे नुकसान झाले. सर्व बाजूने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना नगदी स्वरूपात मदतीची गरज आहे. मात्र अद्याप मदतीची घोषणाच झाली नाही. हे शेतकऱ्यांचे दुर्दैव होय. या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)