गोतावळ्यातील लढतीत कोण ठरणार बाजीगर?

By Admin | Updated: November 15, 2016 01:52 IST2016-11-15T01:52:02+5:302016-11-15T01:52:02+5:30

शहर विकासाच्या वल्गना करीत पुढाऱ्यांनी नगरपरिषदेच्या आखाड्यात शड्डू ठोकला आहे. प्रचाराचा धुरळा

Who will be the defender in the dugout? | गोतावळ्यातील लढतीत कोण ठरणार बाजीगर?

गोतावळ्यातील लढतीत कोण ठरणार बाजीगर?

नगरपरिषद : राजकीय गुरू-शिष्य आणि सवंगडीच आमने सामने
यवतमाळ : शहर विकासाच्या वल्गना करीत पुढाऱ्यांनी नगरपरिषदेच्या आखाड्यात शड्डू ठोकला आहे. प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. मात्र, उमेदवारांच्या भाऊगर्दीत बहुतांश मोहरे एकमेकांचे नातेवाईकच असल्याचे पाहून मतदार चकित होत आहेत. पती-पत्नी, मामा-भाचा, भाऊ-भाऊ, दीर-वहिनी अशा उमेदवारांच्या जोड्याच सध्या दारोदारी मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. राजकारणातील गुरूविरोधात शिष्यही जोर आजमावत आहे. तर कधी काळी जय-विरूची जोडी म्हणून ओळख असलेले आपसात दोन हात करत आहे.
यवतमाळ नगरपालिकेमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात झाला आहे. माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक बाळासाहेब चौधरी हे शिवसेनेच्या तिकिटावर १२-ब आणि १८-अ अशा दोन प्रभागांतून नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या अर्धांगिणी आणि माजी नगरसेविका कांचन चौधरी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. प्रभाग ८ आणि २ मध्ये तर चक्क दोन जोड्या रिंगणात उतरल्या आहेत. राजकीय गुरूच्या विरोधात शिष्याने दंड थोपटले आहे. नगरपरिषदेतील माजी उपाध्यक्ष आनंद गायकवाड स्वत: प्रभाग दोनमधून आणि त्यांच्या पत्नी मालती गायकवाड प्रभाग आठमध्ये रिंगणात आहेत. गायकवाड यांचे बोट धरून नगरपरिषदेची पायरी चढणारे अ‍ॅड. जयसिंह चव्हाण यांनीसुद्धा सपत्नीक उमेदवारी दाखल केली आहे. प्रभाग दोनमध्ये त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका डॉ. अस्मिता चव्हाण यांनी प्रभाग आठमधून रिंगणात आहेत. भाजपाचे विद्यमान नगरसेवक प्रवीण प्रजापती १०-अ आणि २०-अ अशा दोन प्रभागांतून उभे आहेत. तर त्यांचेच बंधू राकेश प्रजापती यांना भाजपाने प्रभाग क्रमांक १३-ब मध्ये उमेदवारी दिली आहे. याच दोन प्रभागांतून जतनसिंग चव्हाण भाजपाकडून प्रभाग आठमध्ये तर त्यांची वहिनी सविता चव्हाण या राष्ट्रवादीकडून प्रभाग दोनमध्ये लढत आहेत. प्रभाग आठमध्ये मामा-भाचेही आमने सामने आहेत. माजी बांधकाम सभापती पंकज मेश्राम अपक्ष म्हणून त्यांचे मामा नवनीत महाजन यांच्या विरोधात लढत आहे. (शहर वार्ताहर)

चार मित्रांत पडली फूट
४यवतमाळ शहरात सर्वाधिक चर्चा आहे ती प्रभाग १८ मधील लढतीची. जय-विरूची जोडी म्हणून पालिकेच्या राजकारणात अनेक वर्ष सत्ता गाजविणारे आता आपसात लढत आहेत. अनेक सुखदु:खात याच चौघांनी कधीच एकमेकाची साथ सोडली नाही. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी, माजी उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी, माजी बांधकाम सभापती कमलकिशोर मिश्रा आणि विद्यमान नगरसेवक अमोल देशमुख या चौघांची मैत्री सर्वश्रुत होती. पहिल्यांदाच यामध्ये फुट पडली असून बाळासाहेब चौधरी हे अमोल देशमुख यांच्या विरोधात तर दत्ता कुळकर्णींच्या पत्नी विभा यांच्या विरोधात विद्यमान नगरसेविका ज्योती कमल मिश्रा या लढत आहेत. ही लढत कशी होते, यावर शहरवासीयांचेच नव्हेतर जिल्ह्यातूनही लक्ष लागले आहे. पालिकेच्या राजकारणात पहिल्यांदाच या जोडगोळीने आपसातच लढण्याचा निर्णय घेतला आहे. कुळकर्णी आणि देशमुख भाजपाकडून तर चौधरी, मिश्रा शिवसेनेकडून शड्डू ठोकून आहेत.

माजी नगराध्यक्षांत टक्कर
४नगरपरिषदेच्या हद्दवाढीनंतर तयार झालेल्या प्रभाग १२ मध्ये माजी नगराध्यक्षांमध्ये टक्कर आहे. येथे भाजपानेही तितक्याच तोडीचा उमेदवार दिला आहे. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी शिवसेनेकडून, माजी नगराध्यक्ष योगेश गढिया काँग्रेसकडून तर माजी उपाध्यक्ष जगदीश वाधवानी भाजपाकडून रिंगणात आहेत. या तिन्ही उमेदवारांकडे निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव आहे. प्रत्येक जण आपल्या वेगळ्या शैलीतील डावपेचांसाठी ओळखले जातात. या तिघांमध्ये काट्याची कुस्तीच रंगणार असून बाजी कोण मारणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. या लढतीतून पुढे आलेली व्यक्तीच पालिकेच्या राजकारणाची बऱ्याच अंशी दिशादर्शक ठरणार आहे.

Web Title: Who will be the defender in the dugout?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.