दोन महिन्यांसाठी कुणी फौजदार होता का हो !

By Admin | Updated: September 11, 2014 23:50 IST2014-09-11T23:50:54+5:302014-09-11T23:50:54+5:30

दोन महिन्यांसाठी कुणी फौजदार होता का फौजदार अशी विचारणा पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभरातील सेवा ज्येष्ठ जमादारांना केली जात आहे. मात्र अवघ्या दोन महिन्यांसाठी डोक्यावर पी-कॅप घालण्यास

Who was a soldier for two months? | दोन महिन्यांसाठी कुणी फौजदार होता का हो !

दोन महिन्यांसाठी कुणी फौजदार होता का हो !

यवतमाळ : दोन महिन्यांसाठी कुणी फौजदार होता का फौजदार अशी विचारणा पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभरातील सेवा ज्येष्ठ जमादारांना केली जात आहे. मात्र अवघ्या दोन महिन्यांसाठी डोक्यावर पी-कॅप घालण्यास फारसे कुणी इन्टरेस्टेड नसल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रात पोलीस उपनिरीक्षकाच्या दीड हजारांवर जागा रिक्त आहेत. समोर सण-उत्सव, विधानसभा निवडणुका असल्याने आत्ताच या जागा भरणे शक्य नाही म्हणून शासनाने यावर तात्पुरत्या व स्थानिक नियुक्त्यांचा तोडगा काढला आहे. पोलीस दलात सेवा ज्येष्ठ असलेल्या सहायक उपनिरीक्षक व जमादारांना पुढील दोन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात आहे त्याच जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. रिक्त पदांवर ही नियुक्ती केली जाणार आहे. विशेष असे संबंधिताला या पदाची वेतनवाढ अथवा कोणतेही सेवा विषयक लाभ मिळणार नाहीत. अर्थात वेतन जमादाराचे आणि काम फौजदाराचे अशी ही नियुक्ती राहणार आहे. ही दोन महिन्यांसाठीची पदोन्नती स्वीकारण्यास तयार असलेल्या एएसआय, जमादारांना लेखी संमतीपत्र फॅक्सद्वारे तातडीने मागण्यात आले आहे. जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांना वायरलेसद्वारे हा संदेश पास झाला असला तरी औटघटकेसाठी फौजदार होण्यास फारसे कुणी उत्सुक नसल्याचे सांगितले जात आहे.
फौजदार पदासाठी यापूर्वी खात्यांतर्गत परीक्षा घेतली गेली. त्यात अनेक पोलीस कर्मचारी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मात्र त्यावेळी गुणांऐवजी सेवा ज्येष्ठता हा निकष लावला गेल्याने अनेक हुशार पोलीस कर्मचारी फौजदाराच्या या स्पर्धेतून बाद ठरले आहे. या पदासाठी प्रतीक्षा यादी लावली गेली असली तरी आतापर्यंत त्यातून रिक्त पदे भरली गेली नाही. निवडणुकीपर्यंत ही प्रतीक्षा यादी एक वर्षाच्या निकषानुसार बाद ठरणार असल्याने या यादीची मुदत किमान तीन वर्ष केली जावी, अशीही मागणी आहे. यापूर्वी परिक्षेत्र आणि आयुक्तालय स्तरावर ११ महिन्यांसाठी फौजदारकी देण्याची पद्धत रुढ झाली होती. मात्र अवघ्या दोन महिन्यांसाठी फौजदारकी हा फंडा रुचलेला नाही. त्यामुळेच कित्येकांनी या तात्पुरत्या फौजदारकीकडे पाठ फिरविल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Who was a soldier for two months?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.