कुणी बेपत्ता तर कुणी झोपलेले
By Admin | Updated: November 18, 2014 23:02 IST2014-11-18T23:02:43+5:302014-11-18T23:02:43+5:30
यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी पुसद विभागातील वन तपासणी नाक्यांवर मध्यरात्री अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी काही नाक्यांवर कर्मचारी नसल्याचे तर कुठे

कुणी बेपत्ता तर कुणी झोपलेले
यवतमाळ : यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी पुसद विभागातील वन तपासणी नाक्यांवर मध्यरात्री अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी काही नाक्यांवर कर्मचारी नसल्याचे तर कुठे कर्मचारी झोपलेले असल्याचे आढळून आल्याची माहिती आहे. गुरमे यांच्या या धाड मोहिमेने वन विभागात खळबळ निर्माण झाली आहे.
मुख्य वनसंरक्षक गुरमे यांनी गेल्या काही दिवसांपासून वनवृत्तात प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन कामाचा धडाका लावला आहे. वन खात्याच्या यंत्रणेला हा अनुभव नवा आहे. कारण आतापर्यंत सहसा कार्यालयातूनच कारभार चालविला गेला. मात्र गुरमे प्रत्यक्ष पुसद, पांढरकवडा, यवतमाळ विभागातील जंगलांमध्ये, वन कार्यालयांमध्ये जाऊन आढावा बैठका घेत आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी पुसद विभागातील वन नाक्यांची मध्यरात्रीनंतर तपासणी केली. या विभागात उमरखेड, धनोडा, शेंबाळपिंपरी, येलदरी, खंडाळा, मारवाडी, पारवा येथे वन तपासणी नाके आहेत. उमरखेडकडून येत असताना गुरमे यांनी या नाक्यांवर भेटी दिल्या. तेथील उपस्थितीची पाहणी केली. एवढेच नव्हे तर भेटीच्या वेळी आढळलेल्या स्थितीचे आपल्या मोबाईलमध्ये फोटोही काढले.
व्ही.व्ही. गुरमे यापूर्वी २००६ ला पुसदचे डीएफओ होते. त्यामुळे या विभागातील व्यवस्था व जंगलाची त्यांना खडान्खडा माहिती आहे. त्यामुळे कुणाच्याही मदतीशिवाय ते या विभागात कुठेही धडक देऊ शकतात. पुसद विभागातील येलदारी आणि शेंबाळपिंपरी वगळता अन्य तपासणी नाक्यांवर पक्के बांधकाम व चांगली व्यवस्था आहे.
खंडाळा येथे तर दांडा आडवा टाकून वाहनांच्या तपासणीची परवानगी आहे. मात्र प्रत्यक्षात ही तपासणी होत नाही. बहुतांश तपासणी नाक्यांवर दिवसा महिला कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली जाते. रात्रीला पुरुष कर्मचारी हे तपासणी नाके सांभाळतात. नियमानुसार या कर्मचाऱ्यांनी नाक्यांवरून पास होणाऱ्या वाहनाचे क्रमांक लिहिणे, त्यातील साहित्याची तपासणी करणे, त्यात सागवान नाही याची खातरजमा करणे बंधनकारक आहे. परंतु प्रत्यक्षात कुठेही हे काम होत नसल्याचे सांगितले जाते. खंडाळा येथे वन वर्तुळाचे कार्यालय आहे. शिवाय तपासणी नाका, विजेची व्यवस्था आहे. मात्र त्यानंतरही तेथे रात्रीला कर्मचारी राहत नसल्याच्या तक्रारी आहे. अन्य नाक्यांचीही अवस्था या पेक्षा वेगळी नाही. येलदरी येथे सोलर लाईटची व्यवस्था आहे. गुरमे यांनी तपासणी नाक्यांची प्रत्यक्ष स्थिती नोंदविली. आता संबंधितांवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)