कुणाच्या लालदिव्याचा प्रकाश सर्वाधिक ?
By Admin | Updated: February 16, 2017 00:09 IST2017-02-16T00:09:39+5:302017-02-16T00:09:39+5:30
जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि १६ पंचायत समित्यांच्या ११० गणांसाठी गुरुवारी १६ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे.

कुणाच्या लालदिव्याचा प्रकाश सर्वाधिक ?
जिल्हा परिषद-पंचायत समितीसाठी आज मतदान : १३ लाख मतदार, २३ फेब्रुवारीला मतमोजणी
राजेश निस्ताने यवतमाळ
जिल्हा परिषदेचे ५५ गट आणि १६ पंचायत समित्यांच्या ११० गणांसाठी गुरुवारी १६ फेब्रुवारी रोजी मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीत कुणाच्या लालदिव्याचा प्रकाश सर्वाधिक पडला हे २३ फेब्रुवारी रोजी उजेडात येणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा जाहीर प्रचार मंगळवारी रात्री थांबला. त्यानंतर प्रत्यक्ष भेटीगाठी व छुप्या प्रचारावर उमेदवारांनी भर दिला. गुरुवारी जिल्ह्यातील १३ लाख ७३ हजार १०४ नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ जागांसाठी ३१५, तर पंचायत समितीच्या ११० जागांसाठी ५९६ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपा, शिवसेना, काँग्रस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनी बहुतांश जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
चारही प्रमुख पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत भाजपाचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, शिवसेनेचे नेतृत्व सहपालकमंत्री संजय राठोड तर काँग्रेसचे नेतृत्व विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे राहिले आहे. राष्ट्रवादीने निवडणुकीची धुरा पक्षाचे पुसद येथील ज्येष्ठ आमदार मनोहरराव नाईक यांच्या खांद्यावर सोपविली आहे. सत्ताधारी भाजपा, शिवसेना आणि विरोधी बाकावरील काँग्रेस या तीन पक्षांकडे जिल्ह्यात लालदिवा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत या तीन पैकी नेमका कोणत्या दिव्याचा प्रकाश ‘ईव्हीएम’च्या माध्यमातून अधिक पडतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. १६ तारखेला मतदान असले तरी त्याची मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार असल्याने त्यानंतरच कुणाचा दिवा अधिक चकाकला, हे स्पष्ट होणार आहे.
भाजपाकडे आणखी दोन लाल दिवे
भाजपात मदन येरावार यांच्या सोबतीला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचाही लालदिवा आहे. त्यांच्या साथीला भाजपाचे उमरखेड, वणी, राळेगाव, आर्णी येथील आमदार आहेत. या पक्षाकडे असलेली प्रचंड वजनदार फौज लक्षात घेता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचीच सरशी जनतेला अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात ग्रामीण भागात तशी स्थिती नाही.
भाजपात ‘आयाराम’मुळे पाडापाडी
मुळात भाजपाचे गावखेड्यापर्यंत नेटवर्कच नाही. पर्यायाने दमदार-सक्षम उमेदवारांचा अभाव आहे. त्यामुळे या पक्षावर अखेरच्या क्षणी दुसऱ्या पक्षातून उडी मारुन आलेल्या बंडखोराच्या गळ्यात भाजपाचा शेला घालून त्याला उमेदवार म्हणून निवडणुकीच्या बोहल्यावर चढविण्याची वेळ आली. त्यामुळे या पक्षातील संघ-भाजपा विचाराचे जुने कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले. उडी मारुन आलेला कायम आपल्या डोक्यावर बसेल असा विचार करून भाजपात पाडापाडीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र पहायला मिळते आहे. त्यात आता कोण तरतो आणि कोण पडतो हे पाहणे महत्वाचे ठरते.
शिवसेनेला साथ खासदार, आमदाराची
जिल्ह्यात शिवसेनेचे एकच आमदार आणि तेच राज्यमंत्री आहेत. त्यांच्या साथीला खासदार भावनाताई गवळी आणि विधान परिषदेचे सदस्य प्रा. तानाजी सावंत आहेत. तानाजींचे निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून जिल्ह्याला दर्शन झालेले नसले तरी बहुतांश उमेदवार त्यांनी दिलेल्या ‘शक्ती’वरच निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावित आहेत.
काँग्रेसकडे दीर्घ अनुभवी फौज
काँग्रेसकडे विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या रुपाने एकमेव लालदिवा असला तरी वर्षानुवर्षे मंत्री राहिलेले दीर्घ अनुभवी अॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके तसेच माजी आमदार वामनराव कासावार, विजयराव खडसे, विजयाताई धोटे, नंदिनी पारवेकर आदी नेते त्यांच्या साथीला आहेत. त्यामुळे विरोधी बाकावर असले तरी त्यांचीही ताकद बरीच असल्याचे मानले जाते.
राष्ट्रवादीचे नेतृत्व आमदारांकडे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्येष्ठ आमदार मनोहरराव नाईक यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवित आहे. त्यांना विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग आणि माजी सदस्य संदीप बाजोरिया यांची मोलाची साथ आहे.
वजन व लोकप्रियता कळणार
चारही प्रमुख पक्षांकडे कमी अधिक प्रमाणात वजनदार नेते आहेत. कुठे दिवा तर कुठे दीर्घ अनुभव दिसतो आहे. त्या बळावर ही नेते मंडळी आपल्या पक्षाला जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये किती जागा मिळवून देऊ शकतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या संख्याबळावरच उपरोक्त नेत्यांचे जनतेतील खरोखरच वजन व लोकप्रियता किती हे स्पष्ट होणार आहे. या संख्याबळाने या नेत्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीचाही अंदाज बांधणे शक्य होणार आहे. कोण आमदार आपल्या मतदारसंघात किती जागा खेचून आणतो यावर त्यांची पुढील विधानसभेकडे पावले जाणार की थांबणार याचे संकेत मिळणार आहे.