परिचारिकांचा पांढरा गणवेश झाला बदामी
By Admin | Updated: August 26, 2015 02:34 IST2015-08-26T02:34:24+5:302015-08-26T02:34:24+5:30
रुग्णालयाच्या गंभीर वातावरणात पांढऱ्याशुभ्र गणवेशात वावरणाऱ्या परिचारिका आता बदामी गणवेशात दिसणार आहेत.

परिचारिकांचा पांढरा गणवेश झाला बदामी
न्यायालयाचा निर्णय : जिल्ह्यात स्वागत
यवतमाळ : रुग्णालयाच्या गंभीर वातावरणात पांढऱ्याशुभ्र गणवेशात वावरणाऱ्या परिचारिका आता बदामी गणवेशात दिसणार आहेत. गणवेशाच्या रंगात बदल करणाऱ्या न्यायालयाच्या या निर्णयाचे यवतमाळातील परिचारिकांनी स्वागत केले आहे.
रुग्णसेवा करताना पांढरा गणवेश स्वच्छ राखणे कठीण जाते. तो लगेच मळतो. ही बाब लक्षात घेऊन परिचारिकांनी गणवेशाचा रंग बदलून मिळावा, अशी मागणी केली होती. राज्यभरातील परिचारिकांनी बदामी रंगाच्या गणवेशासाठी गेल्या २०-२५ वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावाही केला.
मात्र, दाद मिळत नसल्याने महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने २०१२ साली अखेर न्यायालयाचे दार ठोठवावे लागले. या याचिकेवर सोमवारी २४ आॅगस्ट रोजी निर्णय दिला. त्यात परिचारिकांचा गणवेश बदामी रंगाचा असावा, या बाबीला मान्यता देण्यात आली आहे.
आता राज्यभरातील शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांना बदामी रंगाची साडी किंवा बदामी रंगाचा सलवार कमीज व पांढऱ्या रंगाचा अॅप्रन असा गणवेश परिधान करावा लागणार आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषदेनेही तसे जाहीर केले आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सरकारी क्षेत्रातील सर्व परिचारिकांनी यापुढे बदामी गणवेशातच कर्तव्यावर हजर व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या यवतमाळ येथील अध्यक्ष शोभा खडसे यांनी केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)