अधरपूस प्रकल्प ठरला पांढरा हत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:51 IST2017-10-11T00:51:21+5:302017-10-11T00:51:57+5:30
तालुक्यातील अधरपूस प्रकल्प पांढरा हत्ती ठरला असून शेतकºयांचे ओलिताचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. महागाव तालुका सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अधरपूस प्रकल्पाचे भूमिपूजन केले.

अधरपूस प्रकल्प ठरला पांढरा हत्ती
विश्वनाथ महामुने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यातील अधरपूस प्रकल्प पांढरा हत्ती ठरला असून शेतकºयांचे ओलिताचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
महागाव तालुका सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अधरपूस प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची लांबी जवळपास ६२ किलोमीटर आहे. यात २६ लहान कालवे आहेत. मात्र सिंचन नावापुरतेच होत आहे. कालवे ठिकठिकाणी फुटले आहे. गेल्या १० वर्षांपासून अधिकारी केवळ एका बिनतारी संदेश चालक कर्मचाºयामार्फत थातुरमातूर कालवा दुरूस्ती करीत आहे. या थातुरमातूर डागडुजीने कालव्यातील पाणी केवळ विसाव्या लहान कालव्यापर्यंतच कसेबसे पोहोचते. त्यापुढील लहान कालव्यात पाणी पोहोचत नसल्याने २१ ते २६ मायनर दरम्यान असलेली हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. तालुक्यातील तिवरंग, कोनदरी, भोसा, दहीसावळी, कोसदनी, आंबोडा (मुकींदपूर) येथील शेतकºयांना या प्रकल्पााच कोणताही लाभ होत नाही. त्यांची शेती अद्याप ओलिताखाली आली नाही. अधूरपूस प्रकल्पाची निर्मिती १९७२ मध्ये झाली. मात्र पाणीच मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यांचे ओलिताचे स्वप्न कोमेजले आहे.
अधिकारी भेटतच नाहीत
कलगाव शिवारातील एका शिष्टमंडळाने सवना येथील सिंचन कार्यालयात धडक देऊन आपल्या शेतातून जाणारे कॅनल जेसीबीद्वारे माती टाकून बुजविले जात असल्याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना आल्यापावलीच परतावे लागले.