बोगस डॉक्टर आढळताच तातडीने गुन्हे दाखल करा
By Admin | Updated: October 3, 2015 02:16 IST2015-10-03T02:16:52+5:302015-10-03T02:16:52+5:30
बोगस डॉक्टरांमुळे सर्वसामान्य रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते.

बोगस डॉक्टर आढळताच तातडीने गुन्हे दाखल करा
सचिंद्र प्रताप सिंह : सर्वसामान्यांचा जीव धोक्यात
यवतमाळ : बोगस डॉक्टरांमुळे सर्वसामान्य रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. चुकीचे उपचार झाल्याने रूग्णांच्या अवस्थेत गंभीरता येऊन रुग्ण दगावण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत सर्वच बोगस डॉक्टरांवर तातडीने गुन्हे दाखल करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
महसूल भवन येथे बोगस तथा अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. राठोड, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणमले आदी उपस्थित होते.
यावेळी गेल्या वर्षात तालुकानिहाय आढळलेल्या बोगस डॉक्टरांसह त्यांच्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती डॉक्टर राठोड यांनी बैठकीत सादर केली. मार्च २०१५ पर्यंत जिल्ह्यात १९१ बोगस डॉक्टर आढळून आले आहे. त्यापैकी ७९ डॉक्टरांवर कार्यवाही करण्यात आली आहे. एप्रिल ते आॅगस्ट या कालावधीत १४७ बोगस डॉक्टर आढळून आले असून यापैकी १७ डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यात बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मोहीम घेण्यात आली. या मोहिमेमुळे अनेक बोगस डॉक्टरांवर कार्यवाही झाल्याने अनेकजण दवाखाने बंद करून निघून गेल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
सर्वाधिक बोगस डॉक्टर उमरखेड तालुक्यात व पाठोपाठ राळेगाव, वणी, पुसद, महागाव, दिग्रस येथे आढळून आले आहे. बहुतांश डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून उर्वरित डॉक्टरांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. जे बोगस डॉक्टर दवाखाना बंद करून पळून गेले आहे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याबाबत त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अधिकृत नोंदणी नसलेल्या डॉक्टरांनी प्रॅक्टीसच करू नये. असे आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही केल्या जावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)
ज्या पॅथीत शिक्षण, त्याच पॅथीत प्रॅक्टीस
संबंधित डॉक्टरने ज्या पॅथीमध्ये (उपचार पद्धती) वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे, त्याच पॅथीमध्ये त्या डॉक्टरने प्रॅक्टीस करणे आवश्यक आहे. अॅलोपॅथीची पदवी नसताना बीएचएमएस, बीएएमएस, इलेक्ट्रोपॅथी, नॅचरोपॅथीचे डॉक्टर अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करीत असल्याचे आढळून येत आहे. अशा प्रॅक्टीसची परवानगी नसताना सदर प्रॅक्टीस करीत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.