लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे. मे महिन्यात पूर्ण होणारी प्रक्रिया काही ना काही कारणाने लांबणीवर पडत चालली आहे. पहिल्या टप्प्यात संवर्ग एकच्या ३५३ शिक्षकांच्या बदल्या आटोपल्या आहेत. संवर्ग दोनसाठी शिक्षकांना मंगळवारपर्यंत पोर्टलवर पसंती क्रम नोंदविता येणार आहे. त्यानंतरही अन्य टप्पे राबवावे लागणार आहेत. यामुळे गुरुजींच्या बदलीची प्रक्रिया कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२०२३ मध्ये शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर दोन वर्षांनी बदली होत आहे. जिल्ह्यात ६ हजार ५०० शिक्षक आहेत. त्यापैकी जवळपास ३३०० शिक्षक बदलीस पात्र आहेत. नवीन संचमान्यतेनुसार बदली प्रक्रियाही किचकट झाली आहे. सुरुवातीला फेब्रुवारीपासून प्रकिया सुरू करून ३१ मेपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, संचमान्यतेच्या घोळाने बदली प्रक्रिया उशिरा होत आहे. शाळा सुरू होऊन आता एक महिना पूर्ण होत आहे. शिक्षकांच्या बदलीचा घाट अनेकांच्या पचनी पडला नाही. विशेष संवर्ग एकच्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. आता विशेष संवर्ग दोनच्या शिक्षकांच्या बदल्या आठवडाभरात होण्याची अपेक्षा आहे.
अजूनही आहेत पाच टप्पेबदली प्रक्रियेसाठी एकूण सात टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. रिक्त पदे निश्चित व विशेष संवर्गाची बदली प्रकिया, असे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. आणखी पाच टप्पे बाकी आहेत. यात टप्पा ३ मध्ये विशेष संवर्ग शिक्षक २ साठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंती क्रम भरण्यास वेळ देणे व त्यानंतर अन्य टप्पे पार पडणार आहे.
नव्या संचमान्यतेला संघटनांचा विरोध१५ मार्च २०२४ संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. यासाठी काही संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. न्यायालयाचा निकाल शिक्षक संघटनांच्या बाजूने लागल्यास बदली प्रक्रिया आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
विशेष संवर्ग १ व २ मध्ये कोणाचा समावेश ?विशेष संवर्ग १ मध्ये पक्षाघाताने आजारी, दिव्यांग, हृदयविकार, किडनी, कॅन्सर, थैलेसेमिया, यकृत प्रत्यारोपण झालेले, विधवा, वयाची ५३ वर्ष पूर्ण झालेले आणि ज्यांचे जोडीदार व्याधीग्रस्त आहेत, असे शिक्षक येतात. तर संवर्ग २ मध्ये पती-पत्नी एकत्रिकरण, दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील, एक शिक्षक व दुसरा शासकीय कर्मचारी असेल, यांचा समावेश होतो.