धावत्या बसचे स्टेअरिंग तुटते तेव्हा...
By Admin | Updated: March 9, 2016 00:04 IST2016-03-09T00:04:10+5:302016-03-09T00:04:10+5:30
ब्रेकडाऊन झाल्याने प्रवाशांना त्रास. स्टेअरिंग फेल होऊन बस झाडावर आदळली. ब्रेक निकामी झाल्याने अपघात थोडक्यात टळला, या घटना ‘एसटी’साठी नवीन राहिलेल्या नाही.

धावत्या बसचे स्टेअरिंग तुटते तेव्हा...
चालकाचे प्रसंगावधान : कोटंबा गावाजवळील घटना
यवतमाळ : ब्रेकडाऊन झाल्याने प्रवाशांना त्रास. स्टेअरिंग फेल होऊन बस झाडावर आदळली. ब्रेक निकामी झाल्याने अपघात थोडक्यात टळला, या घटना ‘एसटी’साठी नवीन राहिलेल्या नाही. पण त्याहीपेक्षा गंभीर घटना सोमवारी कोटंबा येथे घडली. धावत्या बसचे स्टेअरिंग तुटून चक्क चालकाच्या हाती आले. प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला अन् प्रवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.
सोमवारी सकाळी एमएच ४०-८७६१ ही बस यवतमाळ-कोटंबा-बाभूळगावसाठी निघाली. दहा ते बारा प्रवासी या बसमध्ये होते. ही बस कोटंबा गावापर्यंत सुस्थितीत पोहोचली. तेथून पुढील प्रवासासाठी निघाली. बसने गती पकडण्यापूर्वीच स्टेअरिंग तुटले. चालकाची घाबरगुंडी उडाली. पण समयसूचकता दाखविल्याने बस थांबली. या बसचा वेग अधिक असता तर मोठा अनर्थ घडला असता. यावेळी बसमध्ये दहा प्रवासी होते. अचानक बस थांबल्याने काय झाले, हे प्रवाशांना कळलेच नाही. पण झाला प्रकार माहीत होताच त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. पर्यायी व्यवस्थेने ते पुढील प्रवासाला निघाले.
सदर बस मार्गावर नेण्यायोग्य नसल्याने कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी थांबवून ठेवली होती. यानंतरही वाहन परीक्षकांनी सदर बस चालकांना फेरीसाठी सोपविली. यावरून आगारात समन्वयाचा प्रचंड अभाव असल्याचे स्पष्ट होते. आगार व्यवस्थापकाचेही यावर नियंत्रण नाही, ही बाबही या निमित्ताने सिध्द झाली आहे. यवतमाळ आगारातील कारभाराचा फटका महामंडळाला बसत आहे. विविध कारणांमुळे आर्थिक नुकसान होत आहे. आता तर प्रवाशांचा जीवावर उठला आहे. विभाग नियंत्रकांनी ही बाब सहज घेऊ नये, अशी अपेक्षा कामगार आणि प्रवाशांना आहे. (वार्ताहर)