न्यायाधीश शेतात पोहोचतात तेव्हा
By Admin | Updated: July 27, 2014 23:58 IST2014-07-27T23:58:30+5:302014-07-27T23:58:30+5:30
न्यायमूर्ती म्हटले की, प्रत्येकालाच वेगळे अप्रूप असते. एक अनासक्त भीती सामान्यांच्या मनात असते. मात्र घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश तेजवंतसिंग संधू यांनी आपल्यातील सामाजिक उत्तरदायित्वाच्या

न्यायाधीश शेतात पोहोचतात तेव्हा
विहिरीची पाहणी : शासकीय योजनेच्या लाभार्थ्याच्या शेतात प्रत्यक्ष भेट
घाटंजी : न्यायमूर्ती म्हटले की, प्रत्येकालाच वेगळे अप्रूप असते. एक अनासक्त भीती सामान्यांच्या मनात असते. मात्र घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश तेजवंतसिंग संधू यांनी आपल्यातील सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून दहेगाववासीयांना आपलेसे करून घेतले. उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी चक्क एका लाभार्थ्याच्या शेतात जाऊन योजनेची पाहणी केली. यामुळे दहेगाव सारख्या छोट्याशा खेड्यातील नागरिकांना न्यायाधीशांचे सामाजिक उत्तरदायित्व अनुभवता आले.
अनुसूचित जाती-जमातींनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा या हेतूने आयोजित कायदेविषयक शिबिर पार पडल्यानंतर चक्क न्यायाधीशांनीच एका लाभार्थ्याच्या शेतात जावून प्रत्यक्ष पाहणी केली. यातून न्यायपालिकेचे सामाजिक भान किती प्रगल्भ आहे याचा प्रत्यय नुकताच घाटंजीवासीयांना आला.
दहेगाव येथे तालुका विधी सेवासमितीच्यावतीने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनुसूचित जाती जमाती कौटुंबिक हिंसाचार कायदा विषयक माहिती देण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रथम श्रेणी न्यायाधीश तेजवंतसिंग संधू, अॅड. बाजपेयी, अॅड.नेताजी राउत, कृ षी अधिकारी संजय पवार, नायब तहसीलदार वीर, मंडळ अधिकारी विजय बकाले, जोत्सना खोब्रागडे, पांडुरंग सिदुरकर , ताई कांबळे, तलाठी पंचबुध्दे आदींची उपस्थिती होती. अनुसूचित जाती जमातींच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जातात काय हे पाहण्यासाठी न्या. संधू यांनी आदिवासी उपाययोजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या शेतकरी विजय परचाके यांचे शेताला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतातील विहिरीची पाहणी केली. योजनेचा लाभ घेऊन शेतात घेतलेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्याचे त्यांनी कौतुकही केले.
शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना न्या.तेजवंतसिंग संधू म्हणाले, वादविवादापेक्षा एकमेकांशी संवाद साधला तर सामाजिक शांतता धोक्यात येणार नाही. विधी सेवा समितीच्या माध्यमातून कायद्याचे ज्ञान प्रत्येकाला होण्यासाठी विधायक प्रयत्न केले जात आहे. यावेळी न्या.संधू यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)