गहू झोपला, मोहोर झडला

By Admin | Updated: February 12, 2015 01:49 IST2015-02-12T01:49:24+5:302015-02-12T01:49:24+5:30

विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात मंगळवारी रात्री झालेल्या अकाली पावसाने जिल्ह्यात विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

The wheat slumped, bloomed | गहू झोपला, मोहोर झडला

गहू झोपला, मोहोर झडला

यवतमाळ : विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात मंगळवारी रात्री झालेल्या अकाली पावसाने जिल्ह्यात विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बहुतांश भागातील गहू झोपला असून बहरलेल्या आंब्याचा मोहोर झडला आहे. शिवाय कापूस पणन महासंघाचा कापूस १५ दिवसानंतर पुन्हा भिजला. काही भागात वीज पुरवठाही ठप्प झाला होता. बुधवारी संपूर्ण दिवसभर वीज सुरळीत करण्याचे काम कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू होते.
यावर्षी खरिपापासूनच शेतकऱ्यांना निसर्ग प्रकोपाचा सामना करावा लागत आहे. उशिराचा पाऊस आणि नंतर ‘ब्रेक के बाद’च्या पावसामुळे संपूर्ण खरीप हंगाम हातचा गेला. सोयाबीनचे पीक काहींना एकरी ५० किलोही झाले नाही. शिवाय दर्जाही घसरला. यातून सुटका होत नाही तोच कपाशीनेही दगा दिला. एकीकडे उत्पादन कमी तर, दुसरीकडे कमी दर यामुळे शेतकरी हवालदिल झाला. यातून सुटका होत नाही तोच रबीतही अवकाळी पावसाचा मारा झेलावा लागत आहे. १५ दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कपाशी आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. यातून सावरच नाही तोच मंगळवारी रात्री पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला.
या पावसामुळे ३१ हजार २८० हेक्टरवरील गव्हाला फटका बसला आहे. पावसासह जोरदार वारा असल्याने ओंब्यावर आलेला गहू आडवा झाला. त्यामुळे गव्हाचे उत्पादन घटण्याचाही धोका आहे. यासोबतच भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आंबा बार मोठ्या प्रमाणात गळला. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्याचे उत्पादनही घटण्याचा धोका आहे.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पणन महासंघाने खरेदी केलेल्या कापसाला बसला. यवतमाळ विभागातील सातही केंद्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक नुकसानीचा अंदाज घेणार आहे. काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात कापूस ओला झाला होता. असे नुकसान पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारीच्या सूचना होत्या. यानंतरही ताडपत्र्या उडाल्याने कापूस भिजला. मात्र नुकसानीचे प्रमाण कळू शकले नाही.
यवतमाळ, कळंब, आर्णी, दिग्रस, पुसद आणि उमरखेड या संकलन केंद्रांवर झालेले नुकसान चमू शोधत आहे. हवामान खात्याने आणखी तीन दिवस सतर्कतेची सूचना दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पणनची कापूस खरेदी बंद राहणार आहे.
बिजोरा परिसरात पावसामुळे गहू पिकाचे प्रचंड नुकसान झाले. हजारो हेक्टर क्षेत्रातील गहू पावसामुळे जमीनदोस्त झाला. या प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बाभूळगाव परिसरात जवळपास दोन तास पाऊस झाला. सोंगलेल्या तुरीच्या पेट्या झाकण्यासाठी त्यांना रात्रीच शेताकडे धाव घ्यावी लागली. जोरदार वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने काळोख पसरला होता.
महागाव तालुक्यात यावर्षी उन्हाळी ज्वारी हा नवा प्रयोग शेतकऱ्यांनी केला. मात्र हे पीकही मंगळवारच्या पावसामुळे जमीनदोस्त झाले. शिवाय गव्हालाही फटका बसला. अनेक ठिकाणचे वृक्ष कोलमडले तर वीज पुरवठाही खंडित झाला होता. नुकसानीच्या पाहणीसंदर्भात तहसीलदार विकास माने आणि तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर यांना विचारले असता अद्याप तरी या संदर्भात कुठलीही कारवाई झाली नसल्याचे सांगितले. (लोकमत चमू)

 

Web Title: The wheat slumped, bloomed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.