किन्ही जवादे आश्रमशाळेची दुरावस्था
By Admin | Updated: November 15, 2014 02:12 IST2014-11-15T02:12:06+5:302014-11-15T02:12:06+5:30
येथील शासकीय आश्रमशाळेची दुरावस्था झाली असून याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.शासकीय आश्रमशाळेचे अर्धे सत्र झाले असले तरी ...

किन्ही जवादे आश्रमशाळेची दुरावस्था
किन्ही(जवादे) : येथील शासकीय आश्रमशाळेची दुरावस्था झाली असून याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.
शासकीय आश्रमशाळेचे अर्धे सत्र झाले असले तरी विद्यार्थ्यासाठी आवश्यक सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो. विद्यार्थ्यांना शाळेत पिण्यासाठी व आंघोळीसाठी पाणीच मिळत नाही. विद्यार्थ्यांना शाळेपासून ५०० मिटर लांब असलेल्या गावातील स्मशानभूमीतील हँडपंपावर जावून आपले कपडे धुवावे लागतात तसेच आंघोळ करावी लागते. याबाबत मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता, याबाबत आम्ही वरिष्ठांकडे तक्रार केली असून लवकरच यासंदर्भात योग्य व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. परंतु सहा महिने झाल्यावरही या तक्रारींची दखलच घेतली गेली नसल्याचे दिसून येते. या शाळेने विद्युत बिल न भरल्यामुळे वीज कंपनीच्या वडकी कार्यालयाने शाळेचा विद्युत पुरवठा बंद केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहात विजेशिवाय राहावे लागले आहे. शाळेत सांस्कृतिक भवन आहे. परंतु या भवनावर टीन नाहीत. पावसाळ्यात तर या भवनात पाणी साचलेले असते. वादळामुळे उडालेली टीन अद्याप टाकण्यात आली नाहीत. शासनाने याठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प दिलेला आहे. परंतु तो शासकीय असल्यामुळे शिक्षकांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे त्याचे सुटे भाग शाळेच्या परिसरात तुटलेल्या अवस्थेत पडलेले दिसून येतात. शाळेचा परिसर गलिच्छ असून अशाच वातावरणात विद्यार्थ्यांना जेवण करावे लागते. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या क्वार्टरमध्ये सर्वत्र कचरा जमलेला आहे. अनेक शिक्षक या क्वार्टरमध्ये राहातच नाही. सदर प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट दिली असता शाळेत केवळ दोन शिक्षक उपस्थित होते. उर्वरित सर्व शिक्षक २५ ते ३० किलोमीटर अंतरावरून ये-जा करतात. त्यामुळे ते वेळेवर पोहोचू शकत नाही. एकीकडे शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये शासन खर्च करते. परंतु अधिकारी व शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे शासनाचे या मूळ हेतूला हरताळ फासल्या जात असल्याचे दिसून येते. याकडे वरिष्ठांनी त्वरित लक्ष घालून या आश्रमशाळेचा कारभार सुधारावा, अशी मागणी पालक वर्गांमधून होत आहे. (वार्ताहर)