अॅट्रोसिटीमध्ये बदलाची गरजच काय ?
By Admin | Updated: September 10, 2016 00:58 IST2016-09-10T00:58:07+5:302016-09-10T00:58:07+5:30
देशात दलितांवर अत्याचार वाढत आहेत. अॅट्रोसिटी कायद्यातील तरतूदींची निट अंमलबजावणीच केली जात नाही.

अॅट्रोसिटीमध्ये बदलाची गरजच काय ?
सुनील रामटेके : रिपब्लिकन पार्टीचा विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा
यवतमाळ : देशात दलितांवर अत्याचार वाढत आहेत. अॅट्रोसिटी कायद्यातील तरतूदींची निट अंमलबजावणीच केली जात नाही. अशावेळी या कायद्यामध्ये बदल करण्याची गरजच काय आहे, असा सवाल रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (खोब्रागडे) राष्ट्रीय अध्यक्ष सुनील रामटेके यांनी उपस्थित केला.
शुक्रवारी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाचा विदर्भस्तरीय कार्यकर्ता मेळावा यवतमाळात पार पडला. त्यानिमित्त रामटेके यवतमाळात आले होते. ते म्हणाले, विदर्भातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हाच पर्याय आहे. या मुद्यावर आमचा शिवसेनेच्या भूमिकेला प्रखर विरोध आहे. देशाच्या विकासाकरिता बाबासाहेबांनीही छोट्या राज्यांची भूमिका मांडली होती. समाजातील कमजोर घटकांचा विकास छोट्या राज्यांमध्येच होऊ शकतो. अॅट्रोसिटीमध्ये बदल करण्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. मात्र, दलितांवरील वाढत्या अत्याचाराचे काय? या बाबत आम्ही राज्य शासनालाही निवेदन दिले आहे. याची प्रभावी अंमलबजावणीच होत नाही. मग कायदा बदलवायचा म्हणजे तो रद्द करण्याचा डाव आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सुनील रामटेके म्हणाले की, यवतमाळात अनेक मुलभूत प्रश्न प्रलंबित आहे. रस्ते खराब आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आणि इथले प्रतिनिधी विकासाचा गप्पा मारतात. वास्तविक त्यांच्या उदासीनतेमुळेच हे प्रश्न कायम आहे. विदर्भातील मागासलेल्या घटकांचा विकास करायचा असेल तर शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासारख्या विविध महामंडळांचे पुनर्गठण झाले पाहिजे. त्यावर नवे पदाधिकारी दिल्याशिवाय गोरगरिबांना कर्ज मिळणे शक्य नाही. दारिद्र रेषे खालील नागरिकांसाठी शासनाने विविध सवलती जाहीर केल्या. मात्र त्यांचा लाभ श्रीमंत वर्गच लाटत आहे. त्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलले पाहिजे.
आगामी निवडणुकीच्या संदर्भात ते म्हणाले, विदर्भातील नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हापरिषदांच्या निवडणुकांमध्ये आम्ही उतरू. प्रत्येक जागेवर उमेदवार देऊन रिपाइं (खोब्रागडे) स्वतंत्रपणे निवडणुका लढविणार आहे.
पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (खोब्रागडे) राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सेवक गजभिये, राष्ट्रीय महामंत्री तुलसी पगारे, संघटन मंत्री रावसाहेब ढेपे, झारखंड प्रदेशाध्यक्ष संजय कुमार, अमरावती प्रदेशाध्यक्ष रमेश रामटेके, नागपूरच्या सपना प्रधान, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुधाकर घायवान, कुणाल आठवले, अंबादास येरमेकर, जिल्हा प्रभारी मुजीबोद्दीन, प्रवक्ता जफर कनौजी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)