‘पश्चिमालाप’ घडविणार देशाच्या संस्कृतीचे दर्शन
By Admin | Updated: February 27, 2016 02:59 IST2016-02-27T02:59:07+5:302016-02-27T02:59:07+5:30
‘पश्चिमाला’प या विशेष कार्यक्रमातून जिल्ह्यातील नागरिकांना संपूर्ण देशातील विविध संस्कृतींचे ओळख करवून दिली जाणार आहे.

‘पश्चिमालाप’ घडविणार देशाच्या संस्कृतीचे दर्शन
माहिती पत्रिकेचे विमोचन : सोळाही तालुक्यात होणार विविध राज्यातील कलावंतांचे कार्यक्रम
यवतमाळ : ‘पश्चिमाला’प या विशेष कार्यक्रमातून जिल्ह्यातील नागरिकांना संपूर्ण देशातील विविध संस्कृतींचे ओळख करवून दिली जाणार आहे. बळीराजा चेतना अभियानातून होणाऱ्या या उपक्रमाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विमोचन करण्यात आले.
लुप्त होत चाललेल्या भारतीय आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन नागरिकांना व्हावे यासाठी पश्चिमालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ फेब्रवारी रोजी यवतमाळ, २९ रोजी नेर, १ मार्च बाभूळगाव, २ मार्च कळंब, ३ मार्च राळेगाव, ४ मार्च आर्णी, ५ मार्च घाटंजी, ६ मार्च दारव्हा, ७ मार्च पुसद, ८ मार्च दिग्रस, ९ मार्च उमरखेड, १० मार्च महागाव, ११ मार्च केळापूर, १२ मार्च झरी जामणी, १३ मार्च वणी, १४ मार्च मारेगाव येथे हा कार्यक्रम होणार असून नागरिकांसाठी नि:शुल्क राहणार आहे. या कार्यक्रमातून गुजराती संस्कृतीचे दर्शन घडविणारे येथील लोकनाट्य केरवानोवेश आणि दक्षीण गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या डांगी समुदायातील पारंपरिक नृत्य डांग याचे सादरीकरण तसेच उदयपूर येथील राठवा समाजातील पुरुष व महिला यांच्याकडून होळी या उत्सवात केल्या जाणाऱ्या नृत्याचे सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्राचे लोकनृत्य लावणी, शाहीर बापूराव पठ्ठे, भाऊ फक्कड, अण्णासाहेब यांनी काव्यबद्ध केलेल्या लावण्यांचे सादरीकरण होणार आहे.
वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध भारुड सादर होणार आहे. महाराष्ट्राची शौर्यगाथा, स्फुरण भरणारे पोवाड्याचे सादरीकरण यातून होणार आहे. तसेच गोवा राज्याचे समईनृत्य, गोवा येथील धनगर समुदायाचे धनगरी गजा, गोव्याचे लोकप्रिय नाट्य जागरचे दर्शन घडणार आहे. तसेच राजस्थान राज्याचे काचेच्या तुकड्यावर आणि टोकदार खिळ्यांवर केले जाणारे भवाई नृत्य येथील कालेबिया समाजाचे उत्सवादरम्यान केले जाणारे कालेबिया नृत्याचे सादरीकरण होणार आहे. तसेच घुमर, चरीनृत्याचेही सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यात प्रथमच होत असून यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांचा समावेश आहे. भारतीय पारंपारिक संस्कृती आणि कृषी संस्कृती याची सांगड घालून या पश्चिमालाप कार्यक्रमातून संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.
माहितीपत्रिकेचे विमोचन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सचिन शेजाळ उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)