नव्या वसाहतीमधील विहिरी ‘मौत का कुआँ’
By Admin | Updated: May 13, 2017 00:25 IST2017-05-13T00:25:09+5:302017-05-13T00:25:09+5:30
शहराच्या चोहोबाजूंनी नव्या वसाहती विस्तारल्या आहेत. मात्र, ले-आऊट पडण्यापूर्वीपासून या भागात असलेल्या अनेक विहिरी आज बेवारस आहेत.

नव्या वसाहतीमधील विहिरी ‘मौत का कुआँ’
मृतदेहांमुळे पिण्याच्या पाण्याचे वांदे : कठडे बसविण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहराच्या चोहोबाजूंनी नव्या वसाहती विस्तारल्या आहेत. मात्र, ले-आऊट पडण्यापूर्वीपासून या भागात असलेल्या अनेक विहिरी आज बेवारस आहेत. त्यामुळे विहिरीत पडून प्राणी दगावण्याचे प्रकार घडत आहेत. लोहारा परिसरात तर चक्क खुनातील मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अशा विहिरीचा वापर करण्यात आला. त्यामुळे ‘मौत का कुआं’ ठरत असलेल्या या विहिरींवर लोखंडी कठडे बसविण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोहारा, उमरसरा, भोसा, पिंपळगाव आदी परिसरातील खुल्या भूखंडांवर अनेक विहिरी आहेत. ले-आऊट पडण्यापूर्वी असलेल्या यातील बहुतांश विहिरी आजही बेवारस स्थितीत आहेत. काहींना भरपूर पाणी आहे, तर काही कोरड्याठाक आहेत. मात्र या दोन्ही प्रकारच्या विहिरी जिवितहानीसाठी निमंत्रण ठरत आहेत. अनेक विहिरी भूपृष्ठाशी समतल आहेत. त्याच बाजूने ‘ओपन स्पेस’ असल्याने बहुतांश नव्या वसाहतींमधील मुले अशा विहिरींच्या आसपास खेळताना दिसतात.
मोकाट जनावरे विहिरीत पडून दगावण्याच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. भोसा परिसरातील विहिरीत डुक्कर पडून दगावल्याची घटना ताजी आहे. ते डुक्कर काढण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागली. लोहाराच्या सानेगुरुजी नगरातील विहिरींमध्ये तर चार महिन्यांच्या कालावधीत दोन मानवी मृतदेहच सापडले. लोहारातील तरुणाचा अतिशय निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर त्याला अर्धवट जाळण्यात आले आणि विल्हेवाट लावण्यासाठी रात्रीतून आरोपींनी हा मृतदेह विहिरीत आणून टाकला. विशेष म्हणजे, याच विहिरीतून पाच ते सहा घरांमध्ये पिण्याचे पाणी वापरले जाते. मृतदेह विहिरीत असताना तब्बल दोन दिवस नागरिकांनी पाणी पिले. घटना उघडकीस आल्यावर त्यांच्या मनावर काय बेतली, याची काळजी प्रशासनाने केली नाही.
याच भागातील दुसऱ्या एका विहिरीत लोहाऱ्यातीलच एका अल्पवयीन मुलाने रात्रीदरम्यान आत्महत्या केली. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत विहिरीतच होता. सानेगुरुजी नगराच्या प्रवेशद्वारातच अत्यंत मोठ्या गाल्याची विहिरी कठड्याविना आहे. भरपूर पाणी असलेल्या या विहिरीतही दुर्दैवी घटना घडल्यास नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे वांदे होण्याची शक्यता आहे. नव्या वसाहतींमधील मोकळ्या विहिरींवर लोखंडी कठडे बसविण्याची मागणी आहे.
बोअरवेल खुल्याच
पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नव्या वसाहतींमध्ये भरमसाठ बोअरवेल केल्या जात आहेत. मात्र, त्यातील मोजक्याच बोअरवेलला पाणी लागत असून इतर व्यर्थ ठरत आहे. मात्र एकदा खोदलेली ही बोअरवेल बुजविण्याचे कष्ट कोणीही घेताना दिसत नाही. अशा बोअरवेलचे तोंड बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही दुर्लक्ष केले जात आहे.