काट्यातून आता वजनेच झाली गायब

By Admin | Updated: March 14, 2015 02:24 IST2015-03-14T02:24:37+5:302015-03-14T02:24:37+5:30

जवळपास तालुक्यातील प्रत्येक आठवडीबाजारातून वजने गायब झाली आहे. त्याऐवजी चक्क दगड, आलू, कांदे आदी जिन्नसांचा वापर वजन म्हणून केला जात आहे.

The weight has disappeared from the bite now | काट्यातून आता वजनेच झाली गायब

काट्यातून आता वजनेच झाली गायब

मारेगाव : जवळपास तालुक्यातील प्रत्येक आठवडीबाजारातून वजने गायब झाली आहे. त्याऐवजी चक्क दगड, आलू, कांदे आदी जिन्नसांचा वापर वजन म्हणून केला जात आहे. यातून ग्राहकांची फसवणूक होत असतानाही वजन व मापे विभाग मात्र अद्याप निद्रावस्थेतच दिसत आहे.
बाजारात एखादी वस्तू खरेदी करताना भावबाजी केली जाते. त्याचवेळी नकळपतणे आपली जादूई पद्धतीने फसवणूक केली जाते, हे ग्राहकांच्या लक्षातच येत नाही. या भावबाजीतून ग्राहकाला क्षणभर पैसे कमी झाल्याचे समाधान प्राप्त होते. मात्र त्यातून आपलीच फसगत होते. आठवडीबाजारात तर सर्रास ‘दांडी’ मारण्याचा प्रकार सुरू असतो. सर्वच आठवडीबाजारात हिच स्थिती आहे. आठडीबाजारात किरकोळ व्यापारी लांबवरून जातात. त्यांना वजन व माप दर दोन वर्षातून एकदा संबंधित विभागाकडून प्रमाणित करवून घ्यावे लागते. मात्र आठवडीबाजारात जाणारे अनेक छोटे व्यापारी वजन व मापे नियमाप्रमाणे दर दोन वर्षांनी प्रमाणितच करीत नाही. संबंधित वजन मापे विभागाकडून त्यांची साधी कधी चौकशीही होत नाही. त्यामुळे ते आता खूपच निर्ढावलेले आहेत. परिणामी ते सर्रास वस्तू मोजण्यासाठी खुलेआम दगड, बटाटे, कांदे आदींचा वापर करताना आढळून येतात.
एखादवेळी वजन व मापे विभागाचे अधिकारी, कर्मचारी आलेच तर ते अशा विक्रेत्यांशी ‘अर्थपूर्ण’ बोलणी करून परत जातात. त्यामुळे कायद्याची पायमल्ली सुरू असल्याचे चित्र आहे. अनेक किरकोळ व्यापारी गेल्या अनेक वर्षांपासून तीच ती वजन व मापे वापरतात. त्यामुळे ती अत्यंत जीर्ण होतात. त्या वजन व मापाची झीज होऊन त्याचे वजनही कमी होते. त्याच वजन व मापांनी वस्तू तोलून ग्राहकांच्या माथी मारली जाते. ग्राहकाने एक किलो वस्तूची किंमत विक्रेत्याला दिली, तरी त्या वस्तूचे वजन अनेकदा किलोपेक्षा कमीच असते. त्यातच आठबाजारातील काही विक्रेते ‘दांडी’ मारण्यात चांगलेच पटाईत असतात. त्यांच्याजवळ प्रमाणित केलेले वजन, तर सोडाच दुसरेही पर्यायी वजन व माप नसते.
वस्तू तोलताना ते प्रचंड हातसफाई करतात. प्रमाणित तराजूला एक खास दांडी लावून हातसफाई केली जाते. कोणत्याही वस्तूचे वजन करताना ग्राहकांचे लक्ष पारड्यावर असते. हीच संधी साधून विक्रेता ज्या पारड्यात वस्तू ठेवतो, त्या बाजूला पारडे झुकवून कमी वजनाची वस्तू ग्राहकाच्या माथी मारतो. ग्राहकांचे लक्ष नाही, हे बघताच तराजूची दांडी वरील बाजूला लटकवून अलगदपणे तो कमी वजनाची वस्तू ग्राहकाला देतो.
आठवडीबाजारातील विक्रेते अशा अनेक ‘टॅक्ट’ वापरून वजनात हेराफेरी करतात. सध्या तर बाजारात ‘डुप्लीकेट’ वजन मापेही दिसून येतात. वजनावर एक किलो असे नमूद असते, प्रत्यक्षात त्याचे वजन ८०० ग्रॅमच असते. बरेचदा दुकानातील वस्तूपेक्षा आठवडी बाजारातील वस्तू स्वस्त असण्याचे हे एक कारण असते. (शहर प्रतिनिधी)
ग्राहकांची सर्रास लूट
आठवडीबाजारात ग्राहकांची सर्रास लूट होते. वजन व मापे विभागाकडून अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी कधी आठवडीबाजारात वजन तपासण्यासाठी आल्याचे दिसत नाहीत. जागृत ग्राहकाने वजन मापाबद्दल विक्रेत्याला विचारल्यास विक्रेते त्यांच्याशी हुज्जत घालतात. परिणामी ग्राहक नसती भानगड मागे नको म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे विक्रेत्यांचे चांगलेच फावते. कायदे कठोर असले, तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही. संबंधित अधिकारी, कर्मचारी आपली सोय करवून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बसतो. त्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसते. त्यांची फसवणूक अद्याप सुरूच आहे.

Web Title: The weight has disappeared from the bite now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.