साप्ताहिक सुटीआधी नाईट ड्युटी नको

By Admin | Updated: April 3, 2015 00:43 IST2015-04-03T00:43:41+5:302015-04-03T00:43:41+5:30

साप्ताहिक सुटीच्या आदल्या रात्री ड्युटी नको असा पोलीस वर्तूळातील सूर आहे. यासाठी औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेशकुमार

Weekly holidays do not have night duties | साप्ताहिक सुटीआधी नाईट ड्युटी नको

साप्ताहिक सुटीआधी नाईट ड्युटी नको

यवतमाळ : साप्ताहिक सुटीच्या आदल्या रात्री ड्युटी नको असा पोलीस वर्तूळातील सूर आहे. यासाठी औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक अमितेशकुमार यांचा लातूर पॅटर्न राबविण्याची मागणी जोर धरत आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना एकतर आधीच साप्ताहिक सुटी नक्की मिळेल की नाही, याची शाश्वती नसते. त्यातही साप्ताहिक सुटीच्या आदल्या रात्री संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची नाईट ड्युटी लावण्याचा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून पोलीस दलात पडला आहे. नाईट ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत ड्युटी करावी लागते. त्यानंतर त्याला साप्ताहिक सुटीसाठी कार्यमुक्त केले जाते. या नाईट ड्युटीमुळे साप्ताहिक सुटी पूर्णत: उपभोगायला मिळत नाही, त्यादिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत का होईना ड्युटीवर जावेच लागते, अशी ओरड पोलीस कर्मचाऱ्यांमधून ऐकायला मिळते. त्यामुळेच या पोलीस कर्मचाऱ्यांनी साप्ताहिक सुटीच्या आदल्या रात्री नाईट ड्युटी लावू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यासाठी यवतमाळचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अमितेशकुमार यांचा पॅटर्न राबविण्याची सूचना पोलीस वर्तूळातून पुढे आली आहे.
औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले अमितेशकुमार लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तेथे दरबार घेतला. त्यावेळी कल्पना जाधव या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपली नाईट ड्युटीची व त्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची व्यथा मांडली. त्याला तत्काळ प्रतिसाद देत अमितेशकुमार यांनी कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याची साप्ताहिक सुटीच्या आदल्या रात्री नाईट ड्युटी लावू नये, असे आदेश ३१ मार्च रोजी जारी केले.
शिवाय पोलीस अधीक्षकांच्या आदेशाशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याची साप्ताहिक सुटी रद्द करण्यात येवू नये, असेही या आदेशात नमूद केले. या आदेशाचे मराठवाड्यातील पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये स्वागत होत आहे. आता हाच अमितेशकुमार पॅटर्न यवतमाळ जिल्ह्यातही लागू करण्याची मागणी पोलीस वर्तूळातून पुढे आली आहे. शिस्तीचे खाते असल्याने पोलीस कर्मचारी थेट वरिष्ठांकडे आपले गाऱ्हाने मांडू शकत नाहीत. म्हणून अनेक कर्मचारी खासगीत माध्यम प्रतिनिधींपुढे आपले मन मोकळे करत असल्याचे दिसून आले.
(जिल्हा प्रतिनिधी)

एसपींच्या पुढाकाराची प्रतीक्षा
जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पोलिसांची अडचण सोडविण्यासाठी कुणाच्याही मागणीची अथवा प्रस्तावाची प्रतीक्षा न करता स्वत: पुढाकार घ्यावा, जिल्ह्यात साप्ताहिक सुटीच्या आदल्या रात्री नाईट ड्युटी लावण्याचा प्रघात बंद करावा, अशी रास्त अपेक्षा जिल्हा पोलीस दलातून व्यक्त होत आहे.

Web Title: Weekly holidays do not have night duties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.