केळी उत्पादनातून शोधला प्रगतीचा मार्ग
By Admin | Updated: April 20, 2015 00:09 IST2015-04-20T00:09:22+5:302015-04-20T00:09:22+5:30
नैसर्गिक असमतोलामुळे पारंपरिक शेती करणारे शेतकरी देशोधडीला लागले असताना तालुक्यातील एका शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून..

केळी उत्पादनातून शोधला प्रगतीचा मार्ग
दुष्काळी परिस्थितीवर मात : बिजोराच्या श्रीराम ठाकरे यांनी एकरी दोन लाखांचे घेतले उत्पन्न
मुकेश इंगोले दारव्हा
नैसर्गिक असमतोलामुळे पारंपरिक शेती करणारे शेतकरी देशोधडीला लागले असताना तालुक्यातील एका शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळीच्या उत्पादनातून प्रगतीचा मार्ग शोधला आहे. या पिकातून तो एकरी दोन लाख रुपयाचे उत्पन्न घेत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करीत हा प्रयोग यशस्वी झाल्याने अनेकांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.
श्रीराम गुलाबराव ठाकरे रा. बिजोरा असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे २२ एकरी वडिलोपार्जीत शेती आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांच्यावर शेतीचा भार पडला. कोरडवाहू शेतीमुळे उत्पन्न होत नव्हते म्हणून सुरूवातीला त्यांनी शेतातील पडकी विहीर दुरूस्त केली व त्यावरून ओलित सुरू केले. भाजीपाल्याचे चांगले उत्पन्न झाल्याने त्यांचा उत्साह वाढला.
त्यानंतर नवीन विहीर खोदून ओलिताच क्षेत्र वाढविल. परंतु नंतरच्या कालावधीत पाऊस कमी पडल्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली विहिरीचे पाणी कमी पडू लागले. त्यामुळे त्यांनी या अडचणीवर मात करण्याकरिता शेतीमध्ये आधुनिकतेचा वापर करण्याचे ठरविले. २००८ मध्ये तीन एकरात ड्रीप टाकून सीमला मिरचीची लागवड केली. त्यामुळे व्यवस्थीत ओलित व्हायला लागले, तसेच उत्पन्नातही भर पडली. परंतु अशा प्रकारचे पीक घेताना मजुराची अडचण निर्माण झाली. म्हणून ज्या पिकाला मजूर लागणार नाही आणि खर्चाच्या तुलनेत उत्पन्न जास्त होईल या पिकाची लागवड करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
त्यासाठी छत्तीसगड रायपूर, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून संपूर्ण अभ्यास केला. तेव्हा केळीच्या पिकाबद्दल माहिती मिळाली. त्यावरून जळगाव येथून टिश्यू कल्चरचे रोप बोलावून दोन एकरात केळीची लागवड केली. त्यावर ड्रीप, शेणखत, रासायनिक खत व इतर असा एकरी ५० हजार रुपये खर्च केला आणि उत्पन्न दोन लाख रुपये आले. या पिकाला मजूर लागत नाही. शिवाय नैसर्गिक संकटात रिस्क कमी आहे व खर्चाच्या तुलनेत उत्पन्न चांगले. त्यामुळे पुढे क्षेत्र वाढवून चार एकरात केळीची लागवड केली आणि यावर्षी आणखी तीन एकरात लागवडीचे नियोजन केले आहे.
केळीच्या यशस्वी उत्पादनाबद्दल श्रीराम ठाकरे यांचा जळगाव येथे गौराई नवतंत्र केळी पुरस्कार देऊन कृषीमंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरूवातीच्या काळात निसर्गाच्या भरवशावर शेती करून परंपरागत पिके घेत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आल्याचे ते सांगतात. परंतु त्यामुळे खचून न जाता शेतीमध्ये आधुनिकतेचा वापर केल्याने यश संपादन करता आले.
नैसर्गिक संकटात जी पिके या संकटाशी दोन हात करू शकतात. त्याचीच निवड करणे गरजेचे आहे आणि केळीच्या पिकात फार कमी रिस्क असल्याचे ते आपल्या अनुभवातून सांगतात. या पिकामुळे त्यांच्या घरात समृद्धी आली आहे व हिच समृद्धी इतर शेतकऱ्यांच्या घरात नांदावी यासाठी ते मार्गदर्शकाची भूमिका बजावीत आहे. तालुक्यात जवळपास १०० एकरात केळीची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनात केळीकडे वळत आहे. आज एवढे वय झाले असतानाही शेतीसाठीची श्रीराम ठाकरे यांची धडपड वाखाण्याजोगी आहे.