ससेपालनातून शोधला प्रगतीचा मार्ग
By Admin | Updated: October 6, 2016 00:22 IST2016-10-06T00:22:32+5:302016-10-06T00:22:32+5:30
यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दोर गळ्याला आवळत आहे.

ससेपालनातून शोधला प्रगतीचा मार्ग
पूरक व्यवसाय : मुळावा येथील प्रल्हाद देशमुख यांची धडपड
मुळावा : यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी दोर गळ्याला आवळत आहे. मात्र याच यवतमाळ जिल्ह्यातील मुळावा येथील प्रल्हादराव देशमुख यांनी शेतीपूरक व्यवसायातून प्रगतीचा मार्ग शोधला. दुग्ध व्यवसाय आणि शेळी पालनाला ससे पालनाची जोड दिली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या डॉ. प्रल्हाद देशमुख यांच्याकडे १२ एकर ओलिताची शेती आहे. शेतीकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांनी शेतातच घर बांधले. मुलगा कृष्णा डीएड झाला असून नोकरीच्या मागे न लागता त्याने शेतीत स्वत:ला झोकून दिले आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशातून सुरुवातीला चार म्हशी आणल्या. दुधाचा व्यवसाय सुरू झाला. त्यानंतर म्हशीची संख्या वाढविली. दुधातून बऱ्यापैकी पैसा मिळत आहे. अशातच त्यांनी शेळी पालन व्यवसायही सुरू केला. यासोबतच ससे पालन सुरू केले.
या ससे पालनातूनही त्यांना चांगले पैसे मिळत आहे. विशेष म्हणजे बँकेचे कोणतेही कर्ज न घेता त्यांनी हा व्यवसाय उभारला आहे. सकाळी ५ वाजतापासून तर रात्री १० वाजेपर्यंत शेतात राबून प्रगतीचा मंत्र इतर शेतकऱ्यांना देत आहे. त्यांचा हा प्रकल्प पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी शेताला भेट देत असतात. (वार्ताहर)