ग्रामपंचायतीतही परिवर्तनाची लाट

By Admin | Updated: April 24, 2015 01:11 IST2015-04-24T01:11:46+5:302015-04-24T01:11:46+5:30

जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकीतही परिवर्तनाची लाट दिसून आली.

The wave of change in the gram panchayat also | ग्रामपंचायतीतही परिवर्तनाची लाट

ग्रामपंचायतीतही परिवर्तनाची लाट

यवतमाळ लोकमत चमू
जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकीतही परिवर्तनाची लाट दिसून आली. बहुतांश ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना हादरा देत नवख्यांनी बाजी मारली. जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि पाच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांची मतमोजणी संबंधित तहसील कार्यालयात पार पडली. निकाल ऐकण्यासाठी प्रत्येक तहसीलवर ग्रामीण नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. एक-एक निकाल बाहेर यायला लागला आणि विजयोत्सव सुरू झाला. मतमोजणी प्रक्रियेत कुठेही गोंधळ झाला नाही. मात्र पुसद तालुक्यातील श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला पर्यवेक्षकाच्या चुकीचा फटका बसला. येथील वार्ड क्र. २ चा निकाल राखीव ठेवण्यात आला. जिल्ह्यातील गावागावात गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा झाला.
जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतीच्या दोन हजार ८०९ जागांसाठी २२ एप्रिल रोजी मतदान झाले होते. तब्बल सात हजार ६२६ उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला झाला. १६ ही तहसील कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी पार पडली. निकाल ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी तहसील कार्यालयासमोर दिसत होती. एका एका ग्रामपंचायतीचा निकाल बाहेर येत होता. विजयी उमेदवार गुलाल उधळून तहसीलसमोरच आनंदोत्सव साजरा करीत होते. तर पराभूत उमेदवार आपल्या समर्थकांसह काढता पाय घेत होते. यवतमाळ तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात पार पडली. मुरझडी आणि मडकोणा या दोन ग्रामपंचायतींमध्ये दोन उमेदवारांना समान मते मिळाली. त्यामुळे तहसीलदारांच्या कक्षात ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली.
पुसद तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले असून श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र. २ चा निकाल राखीव ठेवावा लागला. मतमोजणी पर्यवेक्षकाच्या चुकीने मतदान यंत्रामधील मेमरी चिफ काढण्यात आली. ही चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा चिफ टाकण्यात आली. त्यामुळे यावर आक्षेप घेण्यात आला. शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी भगवान कांबळे यांनी निवडणूक आयोगाची परवानगी मिळेपर्यंत या वार्डाचा निकाल राखीव ठेवला.
दिग्रस तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. १५ ग्रामपंचायतीवर शिवसेना-भाजपाने तर सहा ग्रामपंचायतीवर काँग्रेसने ताबा मिळविला. महागाव तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीचा निकाल घोषित करण्यात आला. यात अनेक प्रस्थापितांंना हादरा बसला. मलकापूर येथे एका वार्डात दोन उमेदवारांना समान मतदान मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. दारव्हा तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीचे निकाल घोषित झाले असून या ठिकाणी संमिश्र यश मिळाले. काही ठिकाणी प्रस्थापितांनाच सत्ता मिळविण्यात यश आले.
वणी तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी सत्तांतर झाल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. तालुक्यात युवकांनी चांगले यश संपादित केले. पांढरकवडा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर गटाने बाजी मारल्याचे दिसून येते. चालबर्डी ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मारेगाव तालुक्यातील २० ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी होऊन तालुक्यातील नरसाळा या ग्रामपंचायतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झेंडा रोवला. उमरखेड, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, घाटंजी, नेर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना हादरला बसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकीतही परिवर्तनाची लाट दिसून आली.

Web Title: The wave of change in the gram panchayat also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.