दुष्काळी भागातील पाणीसाठ्याचे सर्वेक्षण
By Admin | Updated: July 11, 2016 02:14 IST2016-07-11T02:14:39+5:302016-07-11T02:14:39+5:30
दुष्काळी भागातील पाणीसाठ्याचे सर्वेक्षण शासनामार्फत प्राधिकृत सीआयआय त्रिवेणी वॉटर इन्सिट्यूटच्या चमूमार्फत लवकरच करण्यात येणार आहे.

दुष्काळी भागातील पाणीसाठ्याचे सर्वेक्षण
यवतमाळचा समावेश : पाण्याची तपशीलवार माहिती करणार गोळा
यवतमाळ : दुष्काळी भागातील पाणीसाठ्याचे सर्वेक्षण शासनामार्फत प्राधिकृत सीआयआय त्रिवेणी वॉटर इन्सिट्यूटच्या चमूमार्फत लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठी यवतमाळसह राज्यातील १३ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या दोन-तीन वर्षात राज्यात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाण्याची उपलब्धता, पाणी उपलब्ध करून घेण्याची सुलभता आणि पाण्याची मागणी याबाबतची तपशीलवार माहिती संकलित करण्यासाठी सीआयआय या संस्थेच्या त्रिवेणी वॉटर इन्स्टिट्यूटच्या वतीने वॅटस्कॅ न या प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे.
या प्रणालीचा वापर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील दुष्काळग्रस्त १३ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार त्रिवेणी वॉटर इन्सिट्यूटच्या चमूमार्फत निवड करण्यात आलेल्या राज्यातील दुष्काळी १३ जिल्ह्यातील पाणीसाठ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत २ जुलै रोजी सबंधित जिल्ह्यांना पाठविण्यात आले आहे.
दुष्काळी भागातील पाण्याची उपलब्धता, पाणी उपलब्ध करून घेण्याची सुलभता, पाण्याची मागणी व पुरवठा याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी शासनामार्फत यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, बीड, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर व नंदूरबार या तेरा जिल्ह्यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जलसाठ्यांची माहिती संकलित करून त्याचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. त्यावरून वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. (प्रतिनिधी)
संभाव्य नियोजनासाठी मदत
दुष्काळी भागातील पाणीसाठ्याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात घेण्यात येणाऱ्या तपशीलवार माहितीच्या आधारे जिल्हानिहाय पाणी कृती आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार आहे. भविष्याच्या दृष्टीकोणातून संभाव्य नियोजन चांगल्या पद्धतीने होऊ शकणार आहे.