जिल्ह्यातील पाणीटंचाई गुरूवारी गाजणार
By Admin | Updated: April 11, 2017 00:10 IST2017-04-11T00:10:45+5:302017-04-11T00:10:45+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षांनी पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याबाबत विचारविमर्श करण्यासाठी येत्या १३ एप्रिलला तातडीची बैठक बोलाविली आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाई गुरूवारी गाजणार
जि. प. अध्यक्षांनी बैठक बोलाविली : बीडीओ, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी
यवतमाळ : जिल्हा परिषद अध्यक्षांनी पाणीटंचाईवर उपाययोजना करण्याबाबत विचारविमर्श करण्यासाठी येत्या १३ एप्रिलला तातडीची बैठक बोलाविली आहे. ‘लोकमत’मध्ये १० एप्रिलच्या अंकात पाणीटंचाई बाबतचे वृत्त प्रकाशित होताच पदाधिकारी खडबडून जागे झाले असून या बैठकीत संबंधितांची झाडाझडती घेतली जाणार आहे.
जिल्ह्यातील २३७ गावे आणि वाड्यांना एप्रिल ते जून दरम्यान तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याचा पाणीपुरवठा विभागाचा कयास आहे. यात महागाव आणि पुसद तालुक्यातील सर्वाधिक गावांना तडाखा बसणार आहे. मात्र कृती आराखड्यात असमतोल असल्याचे दिसून येत आहे. एप्रिल ते जून दरम्यान तीव्र उन्हाळा असताना पाणीपुरवठा विभागाने कृती आराखड्यात केवळ २५ टँकर आणि खासगी विहिरी अधिग्रहणाच्या उपाययोजना तेवढ्या सुचविल्या आहेत. यामुळे हा आराखडा किती प्रामाणिकपणे तयार करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अध्यक्ष माधुरी आडे यांनी पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन उपाययोजना करण्यासाठी तातडीची बैठक बोलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार येत्या १३ एप्रिलला जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंते, विद्युत विभागाचे अभियंते यांना बैठकीला पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई व उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार कृती आराखड्यात बदल केले जाण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)
माजी सदस्याची लुडबूड कायम
सोमवारी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी स्थायी समितीच्या जुन्या हॉलमध्ये पाणीटंचाईवरील बैठक बोलविण्यासाठी विचारविमर्श करीत होते. यावेळी एक माजी सदस्यही तेथे उपस्थित होते. तेसुद्धा काही सूचना करीत लुडबुड करीत होते. मात्र ते माजी सदस्य बैठकीनंतर हॉलमध्ये पोहोचल्याचा दावा करण्यात आला. नंतर त्यांनी काही पदाधिकाऱ्यांची भेटही घेतली.
पालकमंत्र्यांची धावती भेट
नवनिर्वाचित समाजकल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे यांच्या पदग्रहणासाठी सोमवारी पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हा परिषदेला धावती भेट दिली. यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी त्यांच्या कक्षात पाणीटंचाई व विविध योजनांवर चर्चा केली. यावेळी उपाध्यक्ष उपस्थित होते. मात्र जुन्या हॉलमध्ये त्यांची प्रतीक्षा करीत असलेले उर्वरित पदाधिकारी पालकमंत्री तिकडे न फिरकल्याने निराश झाले.