जिल्ह्यातील ५५ गावांवर पाणीटंचाईचे सावट
By Admin | Updated: December 29, 2014 02:07 IST2014-12-29T02:07:57+5:302014-12-29T02:07:57+5:30
जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये सरासरींपेक्षा २० टक्के पर्जन्यमान घटले आहे. यामुळेच तब्बल नऊ तालुक्यात भुजल पातळी कमी झाली आहे.

जिल्ह्यातील ५५ गावांवर पाणीटंचाईचे सावट
यवतमाळ : जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये सरासरींपेक्षा २० टक्के पर्जन्यमान घटले आहे. यामुळेच तब्बल नऊ तालुक्यात भुजल पातळी कमी झाली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईची झळ बसणार आहे. ५५ गावे पाणीटंचाईच्या सावटात असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. यासाठी पाच कोटी ७० लाखांचा उपाययोजना आराखडाही शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिलेल्या अहवालानुसार नेर, यवतमाळ, आर्णी, केळापूर, कळंब, दिग्रस, उमरखेड, राळेगाव या नऊ तालुक्यांमध्ये भुजल पातळीत घट झाली आहे. तर बाभूळगाव, दारव्हा, वणी, मारेगाव, पुसद, महागाव या सात तालुक्यात मागील पाच वर्षाच्या सरासरीपेक्षा भुजल पातळीत वाढ झाली आहे. या स्थितीत ही पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत कळंब, उमरखेड, दिग्रस, घाटंजी, आर्णी, नेर, यवतमाळ या सात तालुक्यातील ५५ गावात पाणीटंचाई भासणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्यासाठी ४५ टॅँकर लागणार आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर टंचाई आराखडे तयार करण्याचे निर्देश सर्व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच बहुतांश गावात पाणीटंचाई भासणार आहे. मागील वर्षी १८ गावे व एका वाडीवर १६ टॅँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. जिल्ह्याच्या जलाशयातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन यंत्रणेला पाणीटंचाई कक्ष स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. २०१४-१५ मध्ये १०० नवीन विंधन विहिरी, ८४ विशेष नळ योजना दुरूस्ती, १५ तात्पुरत्या नळयोजना, ५० विंधन विहीर दुरूस्ती, २४० विहिरींचे अधिग्रहण, २० विहिरींचे खोलीकरण करणे या उपाययोजनांचा समावेश संभाव्य टंचाई आराखड्यात करण्यात आला आहे. डिसेंबर महिना संपायचा असला तरी कडाक्याच्या थंडीतच येणाऱ्या पाणीटंचाईच्या झळांची दाहकता प्रशासकीय यंत्रणेला जाणवत आहे. त्याच दृष्टिकोणातून उपाययोजनांचे नियोजन केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)