युवाशक्तीची भांबरखेडात जलक्रांती
By Admin | Updated: January 5, 2017 00:27 IST2017-01-05T00:27:14+5:302017-01-05T00:27:14+5:30
युवा शक्तीचा विधायक कामांसाठी उपयोग केल्यास काय प्रत्यय येतो, याचा अनुभव तालुक्यातील भांबरखेडा येथील गावकऱ्यांना आला आहे.

युवाशक्तीची भांबरखेडात जलक्रांती
रासेयोचा पुढाकार : मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी, बंधाऱ्यात तीन महिने पुरेल एवढा साठा
उमरखेड : युवा शक्तीचा विधायक कामांसाठी उपयोग केल्यास काय प्रत्यय येतो, याचा अनुभव तालुक्यातील भांबरखेडा येथील गावकऱ्यांना आला आहे. मिलिंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विद्यार्थ्यांनी बांधलेल्या बंधाऱ्यामुळे गावात जलक्रांती झाली.
भांबरखेडा हे गाव उमरखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे. या गावाजवळून एक नाला वाहतो. परंतु पावसाळ्यात पाणी वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता निर्माण होते. याच गावात मिलिंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे शिबिर घेतले जाते. तीन वर्षांपूर्वी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अनिल काळबांडे यांच्या मार्गदर्शनात सिमेंट पोते बंधारा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. युवा शक्तीने बघता-बघता २० फूट लांब, सहा फूट उंच, चार फूट रुंद साधारणत: ८०० पोत्यांचा हा बंधारा बांधला. आता या बंधाऱ्यात पाणी साचले आहे. गत तीन वर्षांपासून या बंधाऱ्यात पाणी साचलत असल्याने लाखो लिटर पाणी गावकऱ्यांच्या उपयोगात येत आहे. यासाठी शेतकरी संतोष देशमुख, संतोष जोगदंडे, दीपक धर्माधिकारी, ग्रामविकास अधिकारी विजय कांबळे, प्राचार्य खेमधम्मो यांनी सहकार्य केले. आता या बंधाऱ्यात सुमारे साडेपाच लाख लिटर पाणी साठले असून तीन महिने हा पाणीसाठा कमी होणार नाही.
रासेयोचे स्वयंसेवक विजय कांबळे, श्याम पाटे, सिद्धांत कांबळे, धम्मदिना ढोले, समता मनवर, प्रियंका ढोले, संगेश कांबळे, राजकिरण खडसे, अरविंद मनवर, संतोष जगदंड, दिव्या गव्हाणे, विद्या मनवर यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)