पुसदच्या माळपठारात पाणी पेटले
By Admin | Updated: April 8, 2017 00:12 IST2017-04-08T00:12:16+5:302017-04-08T00:12:16+5:30
पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या माळपठार भागात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे.

पुसदच्या माळपठारात पाणी पेटले
प्रादेशिक योजना कुचकामी : आठ दिवसातून एकदाच नळ, शेतशिवारातील विहिरींचा आधार
पुसद तालुक्याचे वाळवंट म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या माळपठार भागात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पाण्यासाठी हाहाकार सुरू आहे. माळपठार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे नळ आठ दिवसातून एकदाच येत असल्याने मुलांसह वृद्धांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शेतशिवारातील विहिरींवरून भर उन्हात बैलगाडी आणि डोक्याहून पाणी आणतानाचे चित्र दिसते. माळपठार भागात पाणीटंचाईमुळे अनेकांनी स्थलांतरण केले असून गावात पाहुणा आल्यास जेवणापेक्षा पाण्याचाच प्रश्न उभा असतो.
पुसद : तालुक्यातील माळपठार भाग पाणीटंचाईसाठी कुप्रसिद्ध आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ४० गाव माळपठार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. इसापूर धरणाच्या जवळा येथे जॉकवेलवरून पाणी घेतले जाते. फेट्रा येथे असलेल्या मुख्य टाकीतून पाणी ४० गावांमध्ये वितरीत केले जाते. परंतु विविध कारणांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अखेरच्या घटका मोजत आहे. उन्हाळ्यात ही योजना कुचकामी ठरली आहे. आठ दिवसातून एकदा नळ येत असल्याने नागरिकांना शेतशिवारातील विहिरींवर जावे लागते.
माळपठारातील बेलोरा, मारवाडी, रोहडा, वाडी, वागजाळी, म्हैसमाळ, पन्हाळा, मांजरजवळा, कुंभारी, हिवळणी, पिंपळगाव, आसोला यासह अनेक गावांत भर उन्हात पाणी भरतानाचे चित्र दिसत आहे. गावागावांत श्रीमंतमंडळी बैलगाडीवर ड्रम बांधून पाणी आणत आहे. रोजमजुरी करणाऱ्यांना डोक्यावर हांडे घेवून पाणी आणावे लागते. शालेय विद्यार्थी गणवेशातच पाणी आणतानाचे चित्र या भागात नवीन नाही. रात्रंदिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पाणीपुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली तर ते वीजपुरवठ्याचे कारण करतात. सुरळीत वीज नसल्याने टाकी भरली जात नाही. त्यामुळे पुरेसे पाणी येत नसल्याचे सांगतात. मात्र, मुख्य कारण पाईप लाईनला लागलेली गळती आणि वसुली आहे. परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. एप्रिल महिन्यातच ही अवस्था, तर मे महिन्यात काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (कार्यालय चमू)