लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील (इसापूर धरण) आरक्षित ०२,०० दलघमी पाणी टंचाई निवारणार्थ पैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिले आहेत. यामुळे नदीकाठावरील ४७ गावांतील पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
ऐन हिवाळ्यातच पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने तसेच पाणीपातळी कमी झाल्याने नदीकाठावरील अनेक गावात उन्हाळा लागण्यापूर्वीच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. पाणी टंचाईमुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सोबत जनावरांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अनेक गावातून पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी गावकरी करीत होते. येथील गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचेकडेही याबाबत मागणी केली होती.
गटविकास अधिकाऱ्यांनी केली होती विनंती उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदी काठावरील ४४ गावातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तेथील टंचाई निवारणार्थ सन २०२४- २५ (सन २०२५ चा उन्हाळा) या वर्षातील टंचाई कालावधी करीता आरक्षित पाणी साठ्यांपैकी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील (इनापूर धरण पाणी उपरोक्त ४४ गावांकरिता निश्चित केलेले १५ दलघमी आरक्षित पाणी नदी पात्रात सोडण्याची विनंती गटविकास अधिकाऱ्यांनी केली होती.
चार महिने कसे काढायचे उभा राहिला होता प्रश्न सन २०२४-२५ चे आरक्षित पाणीसाठा हा ३० जून २०२५ पर्यंत टंचाई कालावधी संपेपर्यंत असल्याने अजून चार ते पान महिने शिल्लक आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत १५.०० दलघमी पाणी नदीचे पात्रात सोडणे उचीत होईल म्हणून ०२,०० दलघमी पाणी पैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्याबाबतची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, यवतमाळ यांनी केली होती.