पैनगंगा तीरावर पाणी पेटले
By Admin | Updated: March 30, 2017 00:06 IST2017-03-30T00:06:55+5:302017-03-30T00:06:55+5:30
विदर्भ-मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या पैनगंगा नदीत सोडलेले पाणी अडविल्यावरून विदर्भ आणि मराठवाडा असा संघर्ष पेटला.

पैनगंगा तीरावर पाणी पेटले
महसूल विभागानेच बांध फोडला : दोन्ही तीरावरील नागरिक आमने-सामने
उमरखेड : विदर्भ-मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या पैनगंगा नदीत सोडलेले पाणी अडविल्यावरून विदर्भ आणि मराठवाडा असा संघर्ष पेटला. पैनगंगेच्या पात्रात बांधलेला बंधारा उमरखेड महसूलने फोडल्याने मराठवाड्यातील नागरिकांनी जोरदार दगडफेक केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. गत काही महिन्यांपासून पैनगंगा कोरडी पडली आहे. त्यामुळे ५० गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली. त्यात तिवरंग, झाडगाव, हातला, दिवट पिंपरी, बारा, बेलखेड, चिंचोली, बिटरगाव, मार्लेगाव, तिवडी, टाकळी, राजापूर, वांगी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, दिघडी, देवसरी, कारखेड, उंचवडद, चातारी, बोरी, करंजी, शिंदगी, गांजेगाव, ढाणकी, सोईट, सावळेश्वर, करंजी, भोजनगर, पिंपळगाव, जेवली, मुरली, लिंगी, सोनदाबी, करोटी, जवराळा, थेरडी आदी गावांचा समावेश आहे. या गावातील नळयोजना बंद पडल्या असून नागरिकांसोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे इसापूर धरणातील पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत होते. यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
दरम्यान, प्रशासनाने याची दखल घेत ६ मार्च रोजी १० दलघमी पाणी इसापूर धरणाच्या डाव्या कालव्यातून पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आले. परंतु कोंडा गावाजवळ पळसपूरसह इतर मराठवाड्यातील गावकऱ्यांनी २० फुटांचा अनधिकृत बंधारा बांधला. त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह खोळंबला. परिणामी खालच्या भागाला असलेल्या गावात पाणीटंचाई कायम होती. शेवटी या भागातील नागरिकांनी तहसीलदार भगवान कांबळे यांना ही माहिती दिली. त्यावरून महसूलचे पथक तत्काळ बंधाऱ्यावर पोहोचले. जेसीबीने बांध फोडण्यास सुरुवात केली, त्यावेळी मराठवाड्यातील नागरिकांनी या पथकावर दगडफेक केली. दोन्हीकडील नागरिक आमने-सामने आले.
तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. उमरखेडचे ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी पोलीस ताफा पाठविला. तब्बल दोन तास दोन्ही तीरांवरील नागरिकांत शाब्दिक वाद सुरू होता. महसूल प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने अखेर हा बंधारा फोडून पाणी प्रवाहीत केले. या घटनेने भविष्यात पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहे. (शहर प्रतिनिधी)