आर्णी तहसीलमध्ये पाण्याची सोयच नाही
By Admin | Updated: May 17, 2017 00:59 IST2017-05-17T00:59:41+5:302017-05-17T00:59:41+5:30
तालुक्याच्या गावखेड्यातून येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी येथील तहसील कार्यालयात पाण्याची सोय करून देण्यात आलेली नाही.

आर्णी तहसीलमध्ये पाण्याची सोयच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : तालुक्याच्या गावखेड्यातून येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी येथील तहसील कार्यालयात पाण्याची सोय करून देण्यात आलेली नाही. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. मात्र ही व्यवस्था करण्यात आली नाही. याची आठवण देण्यासाठी तहसीलदार आर.बी. मांडेकर यांना मिनरल वॉटर पिण्यासाठी देण्यात आले.
या कार्यालयात दररोज हजारो नागरिक येतात. वाढत्या उन्हामुळे तृष्णातृप्तीची गरज आहे. मात्र पाणी पिण्यासाठी नागरिकांना इतर ठिकाणचा आधार घ्यावा लागत आहे. प्रत्येकजण विकत पाणी घेवून तहान भागवू शकत नाही. त्यामुळे मनसेने तहसील कार्यालयासमोर पाणपोई सुरू केली आहे. ही व्यवस्था तहसील कार्यालयाने करणे अपेक्षित होते. मात्र अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नाही. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विशाल देशमुख, सचिन येलगंधेवार, राहुल ढोरे, संदीप गाडगे, मनोज प्रजापती आदी उपस्थित होते.
तालुक्यातील समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाचे कार्यालयच स्वत: तहानलेले आहे, तर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कसा सोडविणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. कार्यालयामध्ये पाण्याची सोय करता येवू नये यामागे संबंधितांचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असल्याचे यावरून दिसून येते. विविध कामे घेवून कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.