जलप्रकल्पांची पातळी घसरली
By Admin | Updated: December 16, 2015 02:42 IST2015-12-16T02:42:50+5:302015-12-16T02:42:50+5:30
पावसाळ्यात जलप्रकल्प भरण्याच्या वाटेवर होते. तर साठवण तलाव हाऊसफुल्ल झाले होेते. या प्रकल्पात पाण्यापेक्षा गाळ अधिक होता.

जलप्रकल्पांची पातळी घसरली
टंचाईचे सावट : पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधारे कोरडे
यवतमाळ : पावसाळ्यात जलप्रकल्प भरण्याच्या वाटेवर होते. तर साठवण तलाव हाऊसफुल्ल झाले होेते. या प्रकल्पात पाण्यापेक्षा गाळ अधिक होता. यामुळे हिवाळ्यात प्रकल्पांनी तळ गाठला आहे. परिणामी जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पावसाळ्यात मध्यम प्रकल्पामध्ये ८० टक्के जलसाठा होता. या जलसाठ्यात चार टक्क्याने घट नोंदविण्यात आली आहे. तर लघुप्रकल्पामध्ये केवळ ५१ टक्के जलसाठा कायम आहे. गावालगतचे सिंचन तलाव, कोल्हापुरी बंधारे आणि ओढे आटले आहेत. यामुळे या साठवण तलावावर सिंचन अवलंबून असलेल्या विहिरींची पातळी खाली घसरली आहे. परिणामी रबीचे सिंचन प्रभावित होण्याचा अंदाज आहे.
हिवाळ्यात पाण्याची पातळी घसरल्याने उन्हाळ्यात सिंचन होणार किंवा नाही, असा गंभीर प्रश्न काही भागात निर्माण झाला आहे. यातून कृषी क्षेत्रातील उत्पन्नाला जबर फटका बसण्याचा धोका निर्माण होणार आहे. जनावरांनाही टंचाई सामना करावा लागेल. (शहर वार्ताहर)