आष्टा वितरिकेचे पाणी शेतात
By Admin | Updated: January 2, 2017 00:28 IST2017-01-02T00:28:50+5:302017-01-02T00:28:50+5:30
बेंबळा प्रकल्पाच्या आष्टा वितरिकेचे पाणी शेतात शिरून शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

आष्टा वितरिकेचे पाणी शेतात
पिकांचे नुकसान : माटेगावच्या नागरिकांचे बेंबळा विभागाला निवेदन
कळंब : बेंबळा प्रकल्पाच्या आष्टा वितरिकेचे पाणी शेतात शिरून शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेली सहा वर्षांपासून माटेगाव शिवारात शेत असलेल्या शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी बेंबळा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे.
आष्टा वितरिकेच्या पाझराचे पाणी शेतात शिरते. सततच्या ओलाव्यामुळे परिसरातील शेती नापिकीची झाली आहे. या वितरिकेचे काँक्रिटीकरण करावे, अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार आश्वासने दिली आहेत. २०१० पासून शेतकऱ्यांना पाझरामुळे नापिकीचा सामना करावा लागत आहे. याची भरपाई द्यावी अथवा शेतजमिन अधिग्रहन करुन शासकीय नियमाप्रमाणे मोबदला द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदनावर गौरव जगताप, मालिनी जगताप, राजेंद्र जगताप, तानबाजी डोंगरे, आशिष जगताप, ज्ञानेश्वर बडनाक, ईश्वर बडनाक, पुंडलिक डायरे, संजय डायरे, किसनाजी दांडेकर, किसना उईके, बलराम उईके, रवींद्र जगताप, रामभाऊ बन्सोड, लक्ष्मीबाई उईके, नीलेश पिसाळकर, बाळाभाऊ उईके, सचिन जगताप आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला
जमिनी चिबडल्याने उत्पादन घटले. परिणामी माटेगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे पिककर्ज थकीत झाले आहे. कर्ज कसे फेडावे आणि कुटुंबाचे पालणपोषण कसे करावे, हा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. ओलाव्यामुळे काहीच पिकत नाही, दुसरीकडे सिमेंट लाईनिंगचे काम केले जात नाही. सिमेंट लाईनिंग करा किंवा आष्टा वितरिकेने पाणी सोडणे थांबवा, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.