परतीच्या पावसाचा कहर

By Admin | Updated: September 25, 2016 02:51 IST2016-09-25T02:51:14+5:302016-09-25T02:51:14+5:30

तब्बल दीड महिना दडून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले असून हा पाऊस मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.

Wasting of the rain | परतीच्या पावसाचा कहर

परतीच्या पावसाचा कहर

तिसऱ्या दिवशी पाऊस : सोयाबीनला कोंब, मूग व उडीदाला फटका
यवतमाळ : तब्बल दीड महिना दडून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले असून हा पाऊस मात्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. गत तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा सोयाबीन, उडीद, मूग पिकांना फटका बसत आहे. काही ठिकाणी तर सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटल्याचे दिसत आहे. शनिवारी दुपारी यवतमाळ शहरासह जिल्ह्यात धुव्वाधार पावसाने हजेरी लावली.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला दमदार पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली. अनेक शेतकऱ्यांनी ओलिताची सोय करून पिकांना कसेबसे जगविले. सोयाबीन, उडीद, मूग काढणीवर आला आणि नेमका याचवेळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. गत आठवडाभरापासून यवतमाळ जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धडाका सुरू आहे. तीन दिवसांपासून सर्वत्र पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे शेतातील वाळलेला सोयाबीन भिजत आहे. काही ठिकाणी सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहे. काढलेला मूग आणि उडीद झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडत आहे.
शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास यवतमाळ शहरात धुव्वाधार पाऊस बरसला. पावसाचा जोर एवढा होता की पाच फुटावरीलही दिसत नव्हते. तसेच जिल्ह्यातील इतरही भागातही जोरदार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस महागाव आणि उमरखेडमध्ये कोसळला. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९३ टक्के पाऊस कोसळला आहे. परतीच्या पावसाने शेतकरी चिंतेत सापडला असून आणखी काही दिवस पाऊस बरसण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (शहर वार्ताहर)
अंतरगाव येथे वीज कोसळून मजूर ठार
बाभूळगाव : तालुक्यातील अंतरगाव येथे वीज कोसळून मजूर ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. किसन गंगाराम वाटबुरे (६६) असे मृताचे नाव आहे. तो गावातील मधुकर राऊत यांच्या शेतात सोयाबीनमध्ये काम करीत होता. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मेघगर्जना होऊन वीज या शेतात कोसळली. त्यात किसन जागीच ठार झाला. त्याच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Wasting of the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.