एकच आर्जव धो धो... पाऊस येवू दे..!
By Admin | Updated: May 31, 2017 00:30 IST2017-05-31T00:30:40+5:302017-05-31T00:30:40+5:30
राज्यात हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या पुसद शहरात यंदा तापमानाने ४६ शी गाठली. त्यात झालेली नागरिकांची

एकच आर्जव धो धो... पाऊस येवू दे..!
घालमेल वाढली : शेतकरी पेरणीस सज्ज, पावसाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : राज्यात हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या पुसद शहरात यंदा तापमानाने ४६ शी गाठली. त्यात झालेली नागरिकांची तगमग आणि हवामान खात्याचा आलेला सुखद अंदाज यामुळे आतुर झालेल्या बळीराजाच्या मुखातून एकच शब्द निघत आहे, धो...धो... पाऊस येवू दे.
यावर्षीच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात सरासरीपेक्षा अधिक आणि समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरो, या वर्षी पाऊस सर्वत्र भरपूर व्हावा अगदी महापूर आला तरी चालेल. अनेक वर्षाच्या दुष्काळाचा ताण संपून जावा अशीच इच्छा तमाम जनतेची मनापासून आहे. आकाशातून पडणारा पाऊस जगण्याचा आधार बनतो हे त्रिकालबाधित सत्य आहेत. तो नाही आता तर काय होते याचा अनुभव आपण घेतोच आहोत. येरे येरे पावसा तुला देतो पैसा, येग येग सरी माझे मडके भरी, या कविता पाठ नसतील अशी पिढी मिळणे कठीण.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार अगदी ३ जूनपासून पाऊस सुरू होईल असे व्यक्त करण्यात आले आहे. पूर्वी हवामान खात्याचा अंदाज हा विनोदाचा भाग मानला जायचा परंतु त्यात नक्कीच सुधारणा झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कोणत्या शहराभोवती ढग जमा आहेत. त्या ढगामध्ये पाण्याची आर्द्रता आणि घनता किती आहे. याचा अंदाज संगणक प्रणालीद्वारे घेता येवू लागला. त्यामुळे यावर्षीच्या मोसमात भरपूर पाऊस पडणार या भाकितावर सर्वांकडूनच समाधान व्यक्त केले जात आहे. यावर्षीच्या हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास ही वेळ लवकरच येवून परिसरात पावसाची उणिव निश्चित भरून निघणार आहे. मान्सूनचे आगमन कधी होते आणि धो धो पाऊस कधी बरसतो याचीच शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.