देवीचे दागिने पळविणारी टोळी जेरबंद

By Admin | Updated: June 10, 2017 01:03 IST2017-06-10T01:03:34+5:302017-06-10T01:03:34+5:30

देवीचे दागिने, मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास करणाऱ्या टोळीला २४ तासांत जेरबंद करण्यात शिरपूर पोलिसांना यश आले आहे.

Warrior gang fleeing goddess jewelery | देवीचे दागिने पळविणारी टोळी जेरबंद

देवीचे दागिने पळविणारी टोळी जेरबंद

शिरपूर पोलिसांची कारवाई : वडजापूरचे मंदिर फोडून केली चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : देवीचे दागिने, मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास करणाऱ्या टोळीला २४ तासांत जेरबंद करण्यात शिरपूर पोलिसांना यश आले आहे. टोळीतील त्रिकुटाजवळून चोरीतील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
रंगा शंकर चित्तलवार, अशोक येल्ला लोणारे व खुशाल रामा दांडेकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वणी तालुक्यातील वडजापूर येथे पुरातन मॉ.आदीशक्ती देवीचे मंदिर आहे. ७ जून रोजी मंदिराचे पुजारी सुधाकर मारोती उईके हे नेहमीप्रमाणे सकाळी देवीची पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता, त्यांना मंदिराच्या लोखंडी गेटचे कुलूप तुटलेले, आतील दानपेटीचे कुलूप फोडून असल्याचे दिसले. तसेच देवीच्या अंगावरील चांदीचा मुकूट, कमरपट्टा, सोन्याची नथ, देवीचे मंगळसूत्र लंपास करण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांनी सायंकाळी शिरपूर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिस निरीक्षक सागर इंगोले यांनी घटनेचे गांभिर्य ओळखून पोलीस उपनिरीक्षक दंदे, नायक पोलीस शिपाई योगेश ढाले, दादाराव चिल्होरकर, राजू बागेश्वर यांना चोरट्यांचा शोध घेण्यासाठी कायर, वडजापूरकडे पाठविले. शोध मोहिमेदरम्यान, कायर येथे रंगा चित्तलवार व अशोक लोणारे हे दोघे संशयितरित्या फिरताना दिसले. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ देवीची सोन्याची नथ आढळून आली. नंतर त्यांना शिरपूर पोलीस ठाण्यात आणून विचारपूस करण्यात आली, तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरी करताना वणी येथील खुशाल दांडेकर हादेखील सोबत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार नायक पोलीस शिपाय उल्हास कुरकुटे व प्रमोद जुनूनकर यांनी रात्री वणी येथे येऊन खुशाल दांडेकर याला त्याच्या घरून अटक केली. हे तिनही गुन्हेगार सराईत असून यापूर्वीदेखील त्यांच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
चोरी केल्यानंतर या तिघांनी सदर दागिने मंदिराच्या मागील बाजूस लपवून ठेवले होते. पोलिसांनी सदर २८ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने, शिरपूरचे ठाणेदार सागर इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Warrior gang fleeing goddess jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.