वरोरा, कळमना बोगस बियाणांचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 21:53 IST2018-06-07T21:53:43+5:302018-06-07T21:53:43+5:30
पर्यावरण व शेतीसाठी घातक ठरणारे बीजी थ्री हे बीटी कपाशीचे वाण आंध्रप्रदेश व गुजरातमधून वरोरा, कळमना मार्गाने वणी, झरी, मारेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माथी हाणले जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.

वरोरा, कळमना बोगस बियाणांचे केंद्र
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : पर्यावरण व शेतीसाठी घातक ठरणारे बीजी थ्री हे बीटी कपाशीचे वाण आंध्रप्रदेश व गुजरातमधून वरोरा, कळमना मार्गाने वणी, झरी, मारेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माथी हाणले जात असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली. उत्पादनाची कोणतीही खात्री नसलेले हे वाण कोणत्याही प्रकारची पावती न देता शेतकऱ्यांना विकले जात असून शेतकरीही भाबडेपणाने ते विकत घेत आहेत.
यातून फसवणूक झाल्यास संबंधित शेतकऱ्याला कोणतीही कारवाई करता येऊ नये, यासाठी बनावट बियाणांचे विक्रेते बियाणे विकल्याचा कोणताही पुरावा मागे सोडत नाहीत. यातून आजवर अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाची बियाणांची या तस्करीवर करडी नजर असली तरी कृषी विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून राजरोसपणे बियाणांची तस्करी सुरूच आहे. यापूर्वी मारेगाव येथील एका अण्णाला बोगस बियाणे प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता मात्र थेट आंध्रातील एजंटच या भागात सक्रिय झाले असून कोणतीही मान्यता नसलेले हे बियाणे मान्यताप्राप्त बियाणांच्या तुलनेत कमी किंमतीमध्ये शेतकऱ्यांना विकण्यात येत आहेत. या बियाणांना आंध्रप्रदेशात मान्यता आहे. मात्र महाराष्ट्रात या बियाणांवर बॅन आणण्यात आले आहेत. असे असले तरी या बियाणांवर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने शेतकरीदेखिल या बियाणे लागवडीवरच भर देत असल्याचे दिसून येत आहे.
वणीसह झरी, मारेगाव तालुक्यातही अशा प्रकारचे बनावट बियाणे विकल्या गेल्याचा कृषी विभागाला संशय आहे. गंभीर बाब ही की, बीजी थ्री म्हणून ओळखले जाणारे कपाशीचे वाण पर्यावरण व शेतीसाठी घातक असताना शेतकरी या बियाणांची लागवड शेतात करताना दिसतात. या बियाणांच्या झाडांवर थेट तणनाशक फवारले तरी झाडाला कोणतीही बाधा होत नाही. त्यामुळे निंदणाच्या खर्चाची बचत होते, असा शेतकऱ्यांचा अनुभव असला तरी या बियाणाला अद्याप कोणतीही परवानगी नसून त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरीही त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे.
बोंडअळीचे शेतकऱ्यांमध्ये अद्यापही धास्ती
मागीलवर्षी वणी उपविभागात कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. बोंडअळीवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांनी विषप्रयोग केले. परंतु हा विषप्रयोग शेतकऱ्यांवरच उलटला. यंदाही शेतकऱ्यांच्या मनात बोंडअळीची धास्ती असून पुन्हा ही बोंडअळी कपाशी उद्ध्वस्त करेल काय, या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहेत.