वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे

By Admin | Updated: June 24, 2015 00:18 IST2015-06-24T00:18:45+5:302015-06-24T00:18:45+5:30

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी

Wardha-Yavatmal-Nanded Railway | वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे

यवतमाळ : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या ४० टक्के वाट्यातील १ हजार कोटी ४२ लाख रुपयांचा निधी केंद्र शासनास टप्प्याटप्प्यात उपलब्ध करून देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांच्या अथक परिश्रमातून या रेल्वे प्रकल्पाला फेब्रुवारी २००८ मध्ये केंद्र शासनाने मान्यता दिली होती. २८४ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे उद्घाटन ११ फेब्रुवारी २००९ रोजी तत्कालिन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते करण्यात आले होते. या प्रकल्पाची मूळ किंमत २७४ कोटी ५५ लाख रुपये होती. आता या रेल्वे मार्गाचा सुधारित खर्च दोन हजार ५०१ कोटी ५० लाख रुपये झाला असून, राज्य शासन आपल्या वाट्याचा ४० टक्के निधी देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाने हा रेल्वेमार्ग लवकर पूर्ण होणार असून, या निर्णयाचे यतमाळकरांनी स्वागत केले आहे.
प्रतिक्रिया
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी राज्याचा ४० टक्के वाटा अर्थात एक हजार ४२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याबाबत भाजपा-शिवसेना युती शासनाने घेतलेला निर्णय महत्वपूर्ण आणि रेल्वे विकासाला गती देणारा ठरला आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिली.
ते म्हणाले, परिवहन खात्यामार्फत हा प्रस्ताव दिला गेला होता. त्याला मंगळवारी कॅबिनेटने मंजुरी दिली. निधी अभावी या रेल्वे प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू होते. परंतु आता निधी उपलब्ध होणार असल्याने ही रेल्वे पूर्णत्वाच्या दिशेने वेगाने धावणार आहे. निधी असल्याने जमीन अधिग्रहणाच्या कामालाही वेग येणार आहे. युती शासनाने पहिल्याच वर्षी एक हजार कोटी रुपये देण्याला मंजुरी देऊन या रेल्वे ट्रॅकवरील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे मार्गाच्या दृष्टीने हा खूप मोठा निर्णय असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.
- संजय राठोड, पालकमंत्री, यवतमाळ

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी युती शासनाने घेतलेला निर्णय अतिशय महत्वपूर्ण असून यामुळे रेल्वे मार्गाचे काम अधिक जलद गतीने होईल. यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. शेतकऱ्यांंना दिलेल्या विविध पॅकेजने जो फायदा झाला नाही तो फायदा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाने होणार असून जिल्ह्याच्या विकासाचे दालनच खुले होणार आहे. या प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे प्रयत्न करीत आहो.
- भावना गवळी, खासदार

अतिशय आनंदाची बाब आहे. मी महाराष्ट्र व केंद्र शासनाला धन्यवाद देतो. हा निर्णय आधीच व्हायला पाहिजे होता. यामुळे यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्याचा विकास होण्यास मदत होईल.
-सुभाष राय, नगराध्यक्ष
महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. विजय बाबुंच्या प्रयत्नांमुळे हे सर्व विकासात्मक कामे मार्गी लागत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे.
- सीए पी.डी. चोपडा

महाराष्ट्र शासनाचा यवतमाळ रेल्वेमार्गाबाबतचा निर्णय स्वागतार्ह आहे. जिल्ह्यात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. उद्योगांना वातावरण अनुकूल आहे. रेल्वेमुळे उद्योग व्यवसायामध्ये भरभराटी निर्माण होईल. जिल्ह्यात नवीन मोठे उद्योग येण्याची संधी आहे. बेरोजगारीही कमी होईल.
- महेंद्र दर्डा, अध्यक्ष, विदर्भ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज

यवतमाळ जिल्ह्याच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीकोणातून महाराष्ट्र शासनाचा निर्णय अतिशय योग्य आहे. आरोग्याच्या दृष्टीकोणातून विचार केल्यास भविष्यात यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे शासनाचेच नियोजन आहे. रेल्वे सुरू झाल्यास यवतमाळ जिल्ह्यासह दूरवरच्या रुग्णांना उपचारासाठी यवतमाळला येणे सोयीचे जाणार आहे.
- डॉ. टी.सी.राठोड,
राज्याध्यक्ष, आयएमए

यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. त्यामुळे रेल्वेमार्ग त्वरित सुरू होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाला थोडा उशीरच झाला. यापूर्वीच हा निर्णय होणे गरजेचे होते. यातून जिल्ह्याचा विकास होईल.
- प्रा. राजेंद्र भांडवलकर, अर्थशास्त्र अभ्यासक

महाराष्ट्र शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु आता रेल्वेचे काम हे वेळेत होणे गरजेचे आहे. अद्याप अनेक ठिकाणी यासाठी जागा निश्चितीही झाली नाही. यासाठी एखाद्या सक्षम अधिकाऱ्याची शासनाने नियुक्ती करावी. दिल्ली मेट्रोप्रमाणे वेळेच्या आधीच हे काम व्हावे. टाईम लिमिट अतिशय आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्याला रेल्वेचा अतिशय फायदा होणार आहे.
- सारंग भालेराव, अध्यक्ष सराफ व्यापारी असो., यवतमाळ.

खासदार विजय दर्डा व खासदार भावना गवळी यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होऊन योग्य भाव मिळणार आहे. शेतकरी आत्महत्या
थांबून विदर्भ विकासाला गती मिळेल.
- अ‍ॅड़ आशीष देशमुख, अध्यक्ष महाराष्ट्र-गोवा बार कौन्सील, मुंबई.

या रेल्वे मार्गाला राज्य शासनाने एक हजार कोटी मंजूर केल्याने विकासाला गती मिळणार आहे. शासन लोकहिताची कामे करीत आहेत. या निर्णयाने
व्यापारी वर्गासोबत
शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे.
- सूरज डुब्बेवार, अध्यक्ष चेंबर आॅफ कॉमर्स, पुसद.

शासनाचा निर्णय स्वागतार्ह असून उशिरा का होईना चांगला निर्णय झाला आहे. कामाला लवकर सुरूवात व्हावी, सहा वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला होता. आता अंमलबजावणीची गरज आहे.
- अ‍ॅड़ ज्ञानेद्रकुमार कुशवाह, रेल्वे संघर्ष समिती, पुसद.

खासदार विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, रेल्वे मार्गाने विकासाला चालना मिळणार आहे. रोजगार निर्मितीतून अनेकांना काम मिळेल, कृषीला चालना मिळेल दळणवळण वाढल्याने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला याचा निश्चित फायदा होईल.
- अ‍ॅड़ सचिन नाईक, पुसद विकास मंच.

Web Title: Wardha-Yavatmal-Nanded Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.