वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडात वादळी पावसाचे तांडव
By Admin | Updated: May 28, 2017 00:54 IST2017-05-28T00:54:41+5:302017-05-28T00:54:41+5:30
रोहिणी नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने शनिवारी सायंकाळी सर्वांचीच दाणादाण उडविली. सुसाट वादळासह आलेल्या या मुसळधार पावसाने

वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडात वादळी पावसाचे तांडव
घरांवरील छपरे उडाली : राजूरजवळ आॅटोरिक्षा उलटला, वणी विश्रामगृहाचे छत उडाले, लाखोंचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : रोहिणी नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने शनिवारी सायंकाळी सर्वांचीच दाणादाण उडविली. सुसाट वादळासह आलेल्या या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरावरील छपरे उडवून नेली. वणीच्या विश्रामगृहावरील चारही खोल्यांवरची छपरे वादळाने उडून गेली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. राजूर फाट्यावर एक आॅटो उलटला. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले. त्यामुळे वणी शहर व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. या वादळामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
शनिवारी सायंकाळी अचानक आभाळात ढग दाटून आले. सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. वाऱ्याचा वेग इतका होता, की या वादळादरम्यान राजूर फाट्यावर वणीकडे येणारा एक मालवाहू आॅटो उलटला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. वणी पोलीस ठाण्यातील दक्षता भवनाच्या इमारतीवर असलेले सोलर यंत्रणा खाली कोसळली. ही यंत्रणा इमारतीच्या सज्जावर कोसळल्याने सज्जाही वाकला. त्याखाली उभ्या असलेल्या दोन दुचाकींचाही यात चुराडा झाला. वणीच्या विश्रामगृहातील व्हिआयपी खोली, दोन अन्य खोल्या व भोजन कक्षावरील छप्पर उडून मागील बाजूस कोसळले. या परिसरातील एक झाडही उन्मळून पडले.
वणी ग्रामीण रूग्णालयातील ट्रामा केअर रूग्णालयात मजुरांसाठी बांधण्यात आलेले टिनाचे शेड उडून गेले. वणी बसस्थानक परिसरातील दोन मोठे जाहिरातींचे फलकही कोसळले. शहरातील काही भागात विजेचे खांब वाकले. काही ठिकाणी तारा तुटल्या. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. झरी, मारेगाव व पांढरकवडा तालुक्यातही वादळाने तांडव घातले. यात मोठे नुकसान झाले.
वीज पुरवठ्यातील त्रुट्या दूर करण्याचे काम सुरू
वादळ सुरू होताच वणी शहरातील सर्वच भागातील वीज पुरवठा खंडित झाला. जवळपास तासभर या वादळी पावसाने तांडव घातले. त्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. वीज पुरवठा खंडित झाल्याने वीज वितरणातील त्रुट्या दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती वीज वितरणचे अभियंता झाडे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. रात्री ८ वाजतानंतरही अनेक भागातील वीज पुरवठा सुरू झाला नव्हता. पाऊस येऊन गेल्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.