वणीत कापूस पोहोचला ५७०० रूपयांवर
By Admin | Updated: January 22, 2017 00:06 IST2017-01-22T00:06:24+5:302017-01-22T00:06:24+5:30
सरकीच्या दरातील तेजीने कापसाचे दर वधारले. लांब धाग्याच्या कापसाला वणीत ५७०० रूपये, तर यवतमाळात ५५३० रूपये क्विंटलचा दर मिळाला.

वणीत कापूस पोहोचला ५७०० रूपयांवर
यवतमाळात ५५३० चा दर : १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी
यवतमाळ : सरकीच्या दरातील तेजीने कापसाचे दर वधारले. लांब धाग्याच्या कापसाला वणीत ५७०० रूपये, तर यवतमाळात ५५३० रूपये क्विंटलचा दर मिळाला.
जिल्ह्यात २० जानेवारीपर्यंत १५ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. दरात होणाऱ्या सुधारामुळे बाजारपेठेत कापसाची आवक वाढत आहे. दरातही सुधारणा होत आहे. लांब, मध्यम आणि आखूड धाग्याच्या कापसानुसार दरात वर्गीकरण करण्यात येते. लांब धाग्याच्या कापसाला सर्वाधिक मागणी व दर आहे.
वणी व मारेगाव परिसरात असा कापूस उपलब्ध असल्याने, तेथील बाजारपेठेत कापसाचे दर सर्वाधिक आहे. तेथे ५६०० ते ५७०० रूपये क्विंटल दराने कापसाची खरेदी केली जात आहे. हा दर इतर ठिकाणी मिळत नाही. यवतमाळ बाजार समितीसह इतर बाजार समितीत ५५०० रूपये क्विंटलचा दर आहे. यवतमाळात गत आठवड्यात कापसाचे दर ५४५० रूपये क्विंटलच्या घरात होते. शनिवारी २१ जानेवारीला कापसाचे दर ५५३० रूपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत यामध्ये ८० रूपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. (शहर वार्र्ताहर)
सहा हजारांची प्रतीक्षा
कापसाच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे कापसाचे दर ६००० रूपये क्विंटलचा पल्ला गाठेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गात वर्तविली जात आहे. या दराच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली आहे. तर व्यापारी ६००० रूपये क्विंटलच्या दराबाबत ठामपणे बोलणे टाळत आहेत.