नऊ महिन्यांपासून अस्तरीकरणाची प्रतीक्षा

By Admin | Updated: August 29, 2014 00:07 IST2014-08-29T00:07:18+5:302014-08-29T00:07:18+5:30

कुंभारकिन्ही प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने तालुक्यातील बिजोरा येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे दरवर्षीच मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कालव्याचे अस्तरीकरण व्हावे, यासाठी डिसेंबर २०१३ मध्ये

Waiting for the update for nine months | नऊ महिन्यांपासून अस्तरीकरणाची प्रतीक्षा

नऊ महिन्यांपासून अस्तरीकरणाची प्रतीक्षा

दारव्हा : कुंभारकिन्ही प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने तालुक्यातील बिजोरा येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे दरवर्षीच मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कालव्याचे अस्तरीकरण व्हावे, यासाठी डिसेंबर २०१३ मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी झालेल्या नुकसानीची मदत व कालव्याच्या अस्तरीकरणाचे आश्वासन देण्यात आले. मात्र नऊ महिने उलटूनही प्रशासनाकडून पूर्तता करण्यात आलेली नाही.
कुंभारकिन्ही प्रकल्पाचा कालवा पाझरून बिजोरा येथील शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केल्याने कृषी सहाय्यक, तलाठी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्वे केला होता. मात्र तीन महिने उलटूनही या नुकसानीचा अहवाल तहसीलदार यांना देण्यात आला नाही. दरम्यान, या कालव्यामुळे बोथ, बिजोरा, धूळापूर, हुसनापूर, राजूरा, माहुली, दारव्हा आदी ठिकाणच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन उभे केले. तेव्हा कालव्याचे अस्तरीकरण करून नुकसानीची मदत देण्यात येईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र या आश्वासनाला नऊ महिने उलटूनही त्याची पूर्तता झालेली नाही. शिवाय कालव्याची डागडूजीही करण्यात आली नाही. त्यामुळे कालव्याचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरत असून शेती पिकाचे नुकसान होत आहे. शेतात पाणी साचून राहात असल्याने जमिनीची पोतही खराब होत आहे. या संदर्भात अनेकदा तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे डिसेंबर २०१३ मध्येच कालव्याच्या गेटला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले. तब्बल १५ दिवस चाललेल्या या आंदोलनाने प्रकल्पाच्या पाण्याच्या भरोशावर रबीची पिके घेणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे कालव्याच्या पाण्याने होत असलेली पिकांची नासाडी आणि कालव्याच्या भरोशावर रबीची पिके घेणाऱ्या दोन गटात संघर्ष पेटला. संघर्ष पेटला की अधिकारी बैठका घेतात. शेतकऱ्यांची समजूत काढून आश्वासन देतात. मात्र या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटू शकतो. मदतीचे आश्वासन हवेतच विरल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Waiting for the update for nine months