ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा
By Admin | Updated: October 25, 2015 02:26 IST2015-10-25T02:26:33+5:302015-10-25T02:26:33+5:30
दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी वेतन त्वरित मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केली आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा
यवतमाळ : दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी वेतन त्वरित मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केली आहे. संघटनेचे राज्य सरचिटणीस लक्ष्मण मोहुर्ले यांनी यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन देता यावे यासाठी शासनाने सहायक अनुदान मंजूर करून वेळोवेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत ग्रामपंचायतीकडे वळते केले. आॅगस्ट २०१३ ते मार्च २०१५ या २० महिन्यांच्या कालावधीतील वेतनासाठीचे अनुदान जमा करण्यात आले. मात्र अजूनही बहुतांश कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. वेतनाची मागणी केल्यास कर वसुली करा, असे सांगितले जाते. मात्र यासाठी ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत नाही.
एकीकडे असहकार आणि दुसरीकडे वेतन नाही अशा परिस्थितीत उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. आता दिवाळी अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. आता तरी वेतन मिळावे अशी अपेक्षा त्यांनी केली आहे. निवेदन देताना राज्य सरचिटणीस लक्ष्मण मोहुर्ले जिल्हाध्यक्ष राजेंद्र राऊत, यवतमाळ तालुकाध्यक्ष मोरेश्वर आदमने, सचिव अरुण मेंढे, गुणवंत नरूले, शिंदे उपस्थित होते. (वार्ताहर)
सेवाज्येष्ठता यादीत घोळ
जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियुक्तीसाठी १० टक्के आरक्षण देण्याकरिता सेवा ज्येष्ठता यादी दरवर्षी तयार केली जाते. यानुसार १ जानेवारी २०१५ ची यादी १ आॅक्टोबर २०१५ ला जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये ग्रामपंचायतीच्या सेवेत नसलेल्या लोकांचाही समावेश करण्यात आला आहे. १ जानेवारी २०१५ पूर्वी वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेल्यांचीही नावे यामध्ये आहेत. जिल्हा परिषदेत नियुक्ती मिळालेल्या व्यक्तींनाही या यादीत सामावून घेतले आहे. एकूणच सेवाज्येष्ठता यादीत घोळ झाला असल्याचे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस लक्ष्मण मोहुर्ले यांनी म्हटले आहे.