जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा

By Admin | Updated: June 20, 2014 00:05 IST2014-06-20T00:05:07+5:302014-06-20T00:05:07+5:30

काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करणारे वामनराव कासावार आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा का देत नाहीत, असा जाहीर सवाल पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

Waiting for the resignation of the District President | जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा

जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा

लोकसभेतील पराभव : काँग्रेस कार्यकारिणी बरखास्तीने अन्यायाची भावना
यवतमाळ : काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करणारे वामनराव कासावार आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा का देत नाहीत, असा जाहीर सवाल पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. या राजीनाम्याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे.
लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम आणि चंद्रपूर या दोनही मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीत काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघातच पक्षाचे उमेदवार माघारले. तेथे शिवसेनेच्या उमेदवाराला २८ ते ६० हजारापर्यंत मतांची आघाडी मिळाली. या निकालानंतर नैतिकता म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व अन्य नेते स्वत:हून पदाचा राजीनामा देतील, अशी अपेक्षा बाळगली जात होती. मात्र राजीनामा तर दूर नेत्यांनी मोदी लाटेमुळे हा पराभव झाल्याचे सांगून आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तब्बल महिनाभराने या पराभवाचा ठपका काँग्रेस कार्यकर्त्यांवर ठेऊन जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली. त्यामुळे कार्यकर्ते आणखी संतप्त झाले. बरखास्तीच्या या निर्णयाने कार्यकर्त्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. या पराभवाला नेत्यांमधील गटबाजी आणि वर्चस्वाची लढाई कारणीभूत असताना कार्यकर्त्यांवर कारवाई का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आमदार वामनराव कासावार यांनी स्वत:चे पद शाबूत ठेऊन कार्यकारिणीत असलेल्या कार्यकर्त्यांचा राजकीय बळी दिल्याने प्रचंड नाराजी पहायला मिळत आहे. कार्यकारिणी बरखास्तीऐवजी वामनरावांनी नैतिकता राखत स्वत:च पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी अपयशाची जबाबदारी स्वत:वर न घेता कार्यकर्त्यांवर लोटून आपले पद शाबूत ठेवल्याचा आरोप होत आहे.
कार्यकर्त्यांमधून जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये तोंडावर एैसीतैसी केल्याने नेतेही अस्वस्थ आहेत. यापुढे प्रत्येकच बैठकांमध्ये कार्यकर्त्यांची ही आक्रमकता कायम राहण्याची चिन्हे पाहता नेत्यांची चिंता वाढली आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी प्रदेशकडून कारवाईची प्रतीक्षा न ठेवता लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत उशिरा का होईना स्वत:हून पदाचा राजीनामा द्यावा, असा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सूर आहे. (जिल्हा प्रतिनिधी )

Web Title: Waiting for the resignation of the District President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.