मोहदा येथे अजूनही पोलीस ठाण्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: July 7, 2016 02:35 IST2016-07-07T02:35:53+5:302016-07-07T02:35:53+5:30
मोठी बाजारपेठ आणि परिसरातील ४० गावे जोडली गेलेल्या मोहदा येथे पोलीस ठाणे सुरू होण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

मोहदा येथे अजूनही पोलीस ठाण्याची प्रतीक्षा
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : ४० गावांची सुरक्षा वाऱ्यावर, अवैध व्यवसायामुळे शांतता धोक्यात
मोहदा : मोठी बाजारपेठ आणि परिसरातील ४० गावे जोडली गेलेल्या मोहदा येथे पोलीस ठाणे सुरू होण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. या ठिकाणी पोलीस ठाणे सुरू व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींकडूनही जोरदार प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी अनेक गावांची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
तत्कालीन गृहमंत्री आर. आर पाटील (दिवंगत) यांनी २०१४ मध्ये पांढरकवडा पोलीस वसाहतीच्या उद्घाटनप्रसंगी यवतमाळ जिल्ह्यात तीन नवीन पोलीस ठाणे मंजूर केले होते. यात मोहदा गावाचाही समावेश होता. दरम्यान, हे पोलीस ठाणे मोहदाऐवजी इतर ठिकाणी नेण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू झाले आहे.
मोहदा गावाची लोकसंख्या सहा हजाराच्या जवळपास आहे. आजूबाजूची ४० गावे मोहदा गावाला जोडली गेली आहेत. या गावांच्या संरक्षणासाठी जवळचे पोलीस ठाणे नाही. २५ किलोमीटर दूर अंतरावर सुरक्षा शोधावी लागते. मोहदा गावातील पोलीस ठाणे दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये, यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. २०१४ मध्ये मंजूर झालेले लोहारा व वंसतनगर हे पोलीस ठाणे सुरू झाले आहेत. मोहदा पोलीस ठाण्यासाठी केव्हा मुहूर्त सापडणार, हा प्रश्न आहे.
मोहदा परिसराच्या विविध गावांमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. मटका, गावठी दारू विक्री सर्रास सुरू आहे. हा व्यवसाय करणाऱ्यांचे काही लोकप्रतिनिधींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांची हिम्मत वाढली आहे.
नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. गावामध्ये आणि जवळच पोलीस ठाणे असल्यास तक्रारी करणे सोयीचे होऊन काय कारवाई झाली, याची विचारणा करणे शक्य होणार आहे.
त्यामुळे मोहदा येथे पोलीस ठाणे त्वरित सुरू करावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)