प्रतीक्षा संपली, आज फैसला

By Admin | Updated: May 15, 2014 23:55 IST2014-05-15T23:55:27+5:302014-05-15T23:55:27+5:30

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला शुक्रवारी होत असून गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपणार आहे. कोण विजयी होणार याची

Waiting is over, today's decision | प्रतीक्षा संपली, आज फैसला

प्रतीक्षा संपली, आज फैसला

 उत्कंठा शिगेला : सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला शुक्रवारी होत असून गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपणार आहे. कोण विजयी होणार याची उत्कंठा शेवटच्या चरणात शिगेला पोहोचली आहे. दारव्हा मार्गावरील शासकीय गोदामात सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली असून दुपारी ३ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

लोकसभा मतदारसंघात १0 एप्रिल रोजी मतदान झाले. तब्बल २६ उमेदवारांसाठी २00९ मतदान केंद्रावर ही प्रक्रिया राबविण्यात आली. १७ लाख ५४ हजार २३८ मतदारांपैकी दहा लाख ३१ हजार ५३३ जणांनी आपला हक्क बजावला. यामध्ये पाच लाख ६४ हजार २७६ पुरुष तर चार लाख ६७ हजार २५७ महिलांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ही २00९ च्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढली. मतदारसंघात गेल्या ३६ दिवसांमध्ये निवडणुकीचीच चर्चा रंगत आहे. एप्रिल-मे या महिन्यामध्ये लग्नाचा धडाका असल्याने आप्तस्वकीयांमध्ये एकमेव लोकसभा निवडणुकीचा विषय चर्चिला जात होता. प्रत्येक जण आपआपल्या परीने कोण विजयी होणार याचे गणितही मांडत होते. गेल्या आठ दिवसात तर आयपीएल क्रिकेटप्रमाणेच निवडणुकीचा सट्टा बाजारही तेजीत आला आहे. अनेकांनी वैयक्तिक पैजाही लावल्या आहेत. आता अंदाज कुणाचा खरा ठरणार हे ईव्हीएमचे सील काढल्यानंतर दिसणार आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभेत शिवसेनेच्या भावना गवळी यांच्यापुढे काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचे आव्हान उभे करण्यात आले होते. ही लढत तुल्यबळ समजली जात आहे. या दोनही उमेदवारांचे पक्षाच्या श्रेष्ठींजवळ चांगले वजन आहे. सरकार स्थापन झाल्यास केंद्रात पद मिळविण्याची निश्‍चिती दोनही गटातून व्यक्त होत आहे.

याशिवाय यवतमाळ जिल्ह्याच्या पुढील राजकारणाचे धृवीकरणच लोकसभेच्या निकालाभोवती झाले आहे. अनेकांच्या वाटचालीला या निकालाने दिशा मिळणार आहे. विशेष करून जिल्हा काँग्रेसमध्ये हा निकाल मोठी उलथापालथ घडविणारा ठरणार आहे.

या प्रमाणेच नव्यानेच लोकसभेच्या आखाड्यात उतरलेल्या मनसेचेही इंजीन कुठपर्यंत धावणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. एकूणच लोकसभेच्या निकालातूनच ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेचे राजकीय समीकरण तयार होणार आहे. यामुळेच जनसामान्यांसोबतच सर्वसामान्य कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मंडळींनाही निकालाची प्रचंड उत्सुकता आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Waiting is over, today's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.