वणीतील बारमालकांना आदेशाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:06 IST2017-09-02T21:05:27+5:302017-09-02T21:06:35+5:30
१ एप्रिलपासून बंद झालेल्या वणीतील दारू दुकानांना आता सुरू होण्याचे वेध लागले आहे. ५ सप्टेंबरनंतर हळूहळू ही दुकाने सुरू होणार आहेत.

वणीतील बारमालकांना आदेशाची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : १ एप्रिलपासून बंद झालेल्या वणीतील दारू दुकानांना आता सुरू होण्याचे वेध लागले आहे. ५ सप्टेंबरनंतर हळूहळू ही दुकाने सुरू होणार आहेत. गत पाच महिन्यापासून अडगळीत पडून असलेली ही दुकाने आता धूळ झटकू लागली आहे. दिवाळीपूर्वीच आता या बार व दारू दुकानांना रंगरंगोटी केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दारू विक्री सुरू करण्याचे आदेश दिल्याने बेरोजगार झालेल्या बारमधील कामगारांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
वणी व शिरपूर पोलिसांच्या हद्दीत १०१ दारू दुकाने होती. त्यात काही देशी दारू दुकानांचाही समावेश होता. मात्र न्यायालयाच्या आदेशाने त्यातील १०१ दुकाने बंद झाली होती. या कारवाईत केवळ ३० दुकाने बचावली. यात तीन ते चार देशी दारू विक्रीच्या दुकानांचा समावेश आहे. आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३१ आॅगस्टला दिलेल्या निर्णयानुसार महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतील सर्व दारू विक्रीची दुकाने सुरू होणार आहेत. वणी शहरातील जवळपास २४ दारू दुकाने ५ तारखेनंतर सुरू होण्याची चिन्हे आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील दुकाने मात्र तूर्तास सुरू होणार नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर वणी, मारेगाव व झरी या तालुक्यातील नगरपालिका व नगरपंचायत हद्दीतील बारचालकांनी तातडीने संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून एक वर्षासाठी परवाना शुल्क उत्पादन शुल्क विभागाकडे भरले आहे. अद्याप दारू दुकाने सुरू करण्याचा आदेश उत्पादन शुल्क विभागाने या बारचालकांना दिला नाही. उत्पादन शुल्क विभागाकडे उच्च न्यायालयाच्या त्या लेखी आदेशाची प्रत अद्याप पोहोचली नाही.
संबंधित बारमालक दररोज उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात फोन करून ‘आदेश मिळाला का’, अशी विचारणा अधिकाºयांना करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने १५ डिसेंबर २०१६ रोजी एका निर्णयाद्वारे राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटरच्या आत मद्य विक्रीस बंदी घातली होती. त्यामुळे वणी उपविभागातील ११३ पैकी ९९ मद्य विक्रीची दुकाने बंद झाली होती. त्यातील केवळ ३४ दुकाने बचावली होती.