काँग्रेसजनांना नव्या प्रदेशाध्यक्षांची प्रतीक्षा

By Admin | Updated: April 4, 2015 01:31 IST2015-04-04T01:31:37+5:302015-04-04T01:31:37+5:30

जिल्हा काँग्रेसला आता नवे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडून नवसंजीवनीची अपेक्षा आहे.

Waiting for the new state president for the Congressmen | काँग्रेसजनांना नव्या प्रदेशाध्यक्षांची प्रतीक्षा

काँग्रेसजनांना नव्या प्रदेशाध्यक्षांची प्रतीक्षा

निमंत्रण देण्याची वेळ : शेतकरी मेळाव्याचे औचित्य, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत तीन ठराव पारित
यवतमाळ :
जिल्हा काँग्रेसला आता नवे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडून नवसंजीवनीची अपेक्षा आहे. त्यासाठी ते केव्हा यवतमाळ जिल्ह्यात भेट देणार याची प्रतीक्षा केली जात आहे. मात्र आणखी प्रतीक्षा न करता शेतकरी मेळाव्याच्यानिमित्ताने चव्हाण यांना यवतमाळात येण्याचे रितसर निमंत्रणच देण्याचे ठरविण्यात आले.
जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी पार पडली. माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, संजय देशमुख, माजी आमदार विजयाताई धोटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सभापती नरेंद्र ठाकरे आदी या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार अशोकराव चव्हाण यांनी निवड झाल्याबद्दल या बैठकीत अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप सरकारच्या मंत्र्यांचा निषेध नोंदविला गेला. चव्हाण यांना जिल्हा भेटीचे निमंत्रण देण्याचे ठरले.
माणिकरावांच्या कार्यकाळात जिल्ह्यात काँग्रेस भुईसपाट झाली. या पक्षाला आॅक्सिजन देण्यासाठीही कुणी उरले नसल्याची टीका राजकीय गोटातून होताना दिसते. काँग्रेसची नेते मंडळी पराभवानंतर जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये जाणे टाळत असल्याचे दिसून येते. नेते घरात आणि कार्यकर्ते आपल्या कामात असे सध्याचे चित्र आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलल्याने निष्ठावंत सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा मात्र पल्लवीत झाल्या आहेत. अशोक चव्हाण येतील आणि जिल्हा काँग्रेसमध्ये प्राण फुंकतील अशी अपेक्षा हे कार्यकर्ते ठेवून आहेत. त्यासाठी त्यांना चव्हाण यांच्या जिल्हा आगमनाची प्रतीक्षा आहे. शेजारीच असल्याने त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यात यायला हवे होते, असाही काँग्रेसच्याच गोटातील सूर आहे. काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा किंवा विभागस्तरीय मेळावा घेणार आहे. या मेळाव्यासाठी अशोक चव्हाण यांना निमंत्रित केले जाणार आहे. चव्हाण यांना केव्हा वेळ मिळतो यावर काँग्रेसच्या या शेतकरी मेळाव्याची तारीख अवलंबून आहे, हे विशेष. यावरून शेतकरी मेळावा हे केवळ औचित्य आहे. मेळावा काँग्रेससाठी तेवढा महत्त्वाचा नसून अशोक चव्हाण यांची यवतमाळ भेट आणि त्यासाठी त्यांचा वेळ महत्त्वाचा असल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)

विरोधी पक्ष म्हणून रस्त्यावर उतरण्याचा अनुभवच नसल्याचा फटका !
गेली १५ वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसवर यावेळी पहिल्यांदाच विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. सतत सत्तेत राहिल्याने आता विरोधी पक्ष म्हणून भूमिका वठविताना काँग्रेस नेत्यांची व कार्यकर्त्यांची बरीच अडचण होताना दिसते. कारण विरोधी पक्षाचा त्यांना तेवढा अनुभवच नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष विरोधी की सत्ताधारी हेच समजत नाही. शेतकरी आत्महत्यांसह दुष्काळ, महागाई, प्रत्यक्षात नसलेले ‘अच्छे दिन’ अशा विविध मुद्यांवर काँग्रेसकडून विरोधी पक्ष म्हणून आक्रमक भूमिका जनतेला अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात या पक्षाच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून क्वचित प्रसंगी आंदोलनाची खानापूर्ती केली जात असल्याचे दिसून येते. जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याची सवय नसल्याचा हा परिणाम मानला जात आहे. ‘फॉर्मेलिटी’ म्हणून अवघ्या फलक आणि प्रेसनोटपुरती ही आंदोलने होताना दिसतात. विरोधी पक्षात असूनही शिवसेनेएवढी जनतेच्या प्रश्नावरील आक्रमकता काँग्रेसमध्ये कधीच पाहायला मिळाली नाही. भाजपकडून होणाऱ्या चुकांवर वॉच ठेवून तोच मुद्दा आंदोलनासाठी निवडला जातोय.

Web Title: Waiting for the new state president for the Congressmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.