दोन वर्षांपासून अपंग तपासणीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: February 25, 2016 02:21 IST2016-02-25T02:21:25+5:302016-02-25T02:21:25+5:30
अपंगांचे हक्क अबाधित रहावे यासाठी शासनाने अनेक कठोर नियम केले आहे. मात्र त्या उपरही अपंगांची अवहेलना शासकीय यंत्रणेकडून केली जाते.

दोन वर्षांपासून अपंग तपासणीच्या प्रतीक्षेत
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार : बेरा आणि नर्व्ह कंडक्शन मशीन बंद
यवतमाळ : अपंगांचे हक्क अबाधित रहावे यासाठी शासनाने अनेक कठोर नियम केले आहे. मात्र त्या उपरही अपंगांची अवहेलना शासकीय यंत्रणेकडून केली जाते. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळस गाठला आहे. अपंगत्वाच्या तपासणीसाठी तब्बल दोन वर्षांपासून रुग्णालयात चकरा मारायला लावल्या जात आहे. येथील अपंगत्व तपासणीसाठी आवश्यक असणाऱ्या मशनरीज वारंवार बंद असतात.
शासनाने अपंगांच्या हक्कांवर गदा येऊ नये व बोगस अपंगांना ओळखता यावे, यासाठी अपंगांची आॅनलाईन नोंदणी सुरू केली आहे. त्याकरिता अपंगत्वाची फेरतपासणी करून आॅनलाईन नोंदणी केली जाते. दारव्हा तालुक्यातील चिखली येथील शिल्पा बळवंत चव्हाण (१६) ही मुलगी कर्णबधीर आहे. तिने आपले अपंगत्व प्रमाणपत्र आॅनलाईन करण्यासाठी सर्व प्रथम २५ नोव्हेंबर २०१४ रोजी शासकीय महाविद्यालयात नोंदणी केली.
त्यावेळी तिला १६ डिसेंबर २०१४ ही तारीख देण्यात आली. १६ डिसेंबरला पुन्हा २१ डिसेंबर ही तारीख देण्यात आली. या वेळेवरही रुग्णालयात उपस्थित राहिल्यानंतर तिला २० फेब्रुवारी २०१६ ही तारीख देण्यात आली. त्यानंतर पुन्हा २३ फेब्रुवारी २०१६ ही तारीख देण्यात आली.
मंगळवारी सकाळी ती तपासणीसाठी कान-नाक-घसा विभागात गेली असता कर्णबधीरता तपासणी करणारी बेरा मशीन बंद असल्याचे तिला डॉक्टरांनी सांगितले. तब्बल दोन वर्षांपासून बेरा तपासणीसाठी या मुलीला वेटींगवर ठेवले जात आहे. वारंवार पुढील तारीख देऊन तिच्या सहनशीलतेचा अंत पाहण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी शेवटी संतप्त होऊन सदर मुलीच्या नातेवाईकांनी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय गाठले. त्यांचा पारा पाहून बेरा मशीन सुरू झाल्यानंतर तुम्हाला बोलाविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र २०१४ पासून एकदाही बेरा मशीन सुरू झाली नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शरीरातील स्नायूंची क्षमता तपासण्यासाठी नर्व्ह कंडक्शन मशीनद्वारे चाचणी केली जाते. त्यानंतर अपंगत्वाचे प्रमाण निश्चित करून तितके टक्के दिले जातात. मागील दोन महिन्यांपासून ही मशीन बंद असून शिल्पाप्रमाणेच इतर अनेक अपंगांना शासकीय रुग्णालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून अपंगांचे तपासणीच्या नावाखाली उतपिडन केले जात आहे. एकीकडे अपंगांना सामाजिक जीवनात वावरताना कुठेही कमी पणा येणार नाही, अशा स्वरूपाचे कायदे अस्तित्वात आहे. तर दुसरीकडे शासनाची यंत्रणाच अपंगांवर सातत्याने अन्याय करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)