दारव्हा पाणीपुरवठा योजनेला पुन्हा प्रतीक्षा

By Admin | Updated: February 11, 2015 00:07 IST2015-02-11T00:07:43+5:302015-02-11T00:07:43+5:30

शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी सुटून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी सुजल व निर्मल अभियानांतर्गत शासनाकडे पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव ....

Waiting for the Darwha Water Supply Scheme again | दारव्हा पाणीपुरवठा योजनेला पुन्हा प्रतीक्षा

दारव्हा पाणीपुरवठा योजनेला पुन्हा प्रतीक्षा

दारव्हा : शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी सुटून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठ्यासाठी सुजल व निर्मल अभियानांतर्गत शासनाकडे पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. ४३ कोटी ९२ लाख २३ हजार रुपयांच्या प्रस्तावास शासनाकडून मान्यता मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.
या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मुंबई येथे मंत्रालयात मंगळवारी बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, दारव्ह्याचे नगराध्यक्ष अशोक चिरडे यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, नगरपरिषद प्रशासन संचालनालय आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ४० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या दारव्हा शहरात नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी चांगली योजना कार्यान्वित नाही. १९७३ मध्ये सुरू झालेली कुपटी नदीवरील मूळ योजना आणि १९९३ मध्ये सुरू झालेली अडाण नदीवरील पेकर्डा पूरक योजना या दोन योजनांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो.
सध्या दारव्हा शहरात तीन हजार १५५ नळजोडण्या आहेत. दररोज १४ लाख लिटर पाणी सोडण्यात येते. परंतु आळीपाळीने पाणी सोडले जात असल्याने नळधारकांना दर दोन दिवसांनी केवळ एक तास पाणी मिळते. त्यातही गेल्या काही वर्षात शहरात विविध कारणांमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाई निवारणार्थ २००९-१० मध्ये अरुणावतीवरून पाईपलाईन टाकण्यात आली. त्यापूर्वी २००४ मध्येसुद्धा कुंभारकिन्ही प्रकल्पावरून पाईप लाईन टाकण्यात आली होती. तरीदेखील शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटू शकला नाही. अनेक वेळा टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती अधूनमधून निर्माण होतच आहे.या पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी अनेक वर्षांपासून शहरवासीयांची मागणी आहे. शहरातील पाणीप्रश्न लक्षात घेता नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी पुढाकार घेवून सुजल व निर्मल अभियानांतर्गत पाणीयोजनेचा प्रस्ताव तयार केला. त्याला तांत्रिक मंजुरात घेवून तो प्रस्ताव फार पूर्वीच शासनाकडे सादर करण्यात आला. नगराध्यक्ष चिरडे यांच्या मागणीवरून पालकमंत्री संजय राठोड यांनी पाणीपुरवठा मंत्र्यांकडे याबाबतचा पाठपुरावा केला. दारव्हा नगरपरिषदेचा हा प्रस्ताव मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु शासनाकडून हिरमोड झाला. (तालुका प्रतिनिधी)
प्रस्तावाला मिळाल्या वाटाण्याच्या अक्षता
सुजल व निर्मल योजनेंतर्गत दारव्हा नगर परिषदेने सादर केलेला पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा यासाठी पालकमंत्री संजय राठोड व नगराध्यक्ष अशोक चिरडे यांनी बैठकीत जोरदार प्रयत्न केले. परंतु सुजल व निर्मल योजना बंद झाली आहे व शहरी पाणीपुरवठा हा विभाग मुख्यमंत्र्यांकडे येतो, त्यामुळे सदर योजनेसाठी नगरोत्थान किंवा राज्यस्तरीय योजनेमध्ये प्रस्ताव सादर करावा, असे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने सुचविण्यात आले. दारव्हा नगर परिषदेने अतिशय परिश्रमपूर्वक प्रस्ताव तयार केला. त्यानंतर त्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरात घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात फी भरली. नगराध्यक्ष चिरडे यांच्यासाठी हा प्रकल्प महत्कांक्षी प्रकल्प आहे. या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्यामुळे नगराध्यक्षांसह सर्वांचाच हिरमोड झाला असून पुन्हा दारव्हेकरांना पाण्यासाठी पुन्हा प्रतिक्षा करावी लागेल, असे दिसते.

Web Title: Waiting for the Darwha Water Supply Scheme again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.