१८ कोटींच्या वणी-पाटण रस्ता डांबरीकरणाची प्रतीक्षा

By Admin | Updated: April 28, 2016 02:19 IST2016-04-28T02:19:55+5:302016-04-28T02:19:55+5:30

वणी-मुकुटबन-पाटण-बोरी या १८ कोटी ७० लाखांचे बजेट असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाची नागरिकांना अद्यापही प्रतीक्षाच आहे.

Waiting for dacoitization of Wani-Patan road of 18 crores | १८ कोटींच्या वणी-पाटण रस्ता डांबरीकरणाची प्रतीक्षा

१८ कोटींच्या वणी-पाटण रस्ता डांबरीकरणाची प्रतीक्षा

केवळ डिपॉझिट जप्ती : ‘आयव्हीआरसीएल’च्या प्लॅन्ट खरेदीचा दावा
वणी : वणी-मुकुटबन-पाटण-बोरी या १८ कोटी ७० लाखांचे बजेट असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाची नागरिकांना अद्यापही प्रतीक्षाच आहे. गेल्या काही महिन्यांपासून डांबरीकरणाचे हे काम रखडले आहे. त्यापोटी केवळ अनामत रक्कम जप्तीची कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे. पुढील कारवाई वाचविण्यासाठी सदर कंत्राटदाराने आयव्हीआरसीएल या कंपनीचा बॅचमिक्स प्लँट खरेदी केल्याचा दावा केला आहे.
वास्तविक बॅचमिक्स प्लॅन्ट खरेदीचा व्यवहार हा रजिस्ट्रार कार्यालयात (दुय्यम निबंधक) होणे बंधनकारक आहे. परंतु कागदोपत्री या प्लॅन्टची खरेदी दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न कंत्राटदाराने केला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यानेही पुढे आलेली कागदपत्रे खरी मानून फार खोलात न जाता ही प्लॅन्ट खरेदी ‘ओके’ केली आहे. मूळात आयव्हीआरसीएलचे स्वत:चेच काम रखडले आहे. करंजी ते घुग्गुस या चौपदरी मार्गाचे काम गेल्या काही वर्षांपासून झालेले नाही. बांधकाम खात्याने आयव्हीआरसीएलला साडेसात कोटींचा दंडही ठोठावला आहे. स्वत:चेच काम अर्धवट असताना आयव्हीआरसीएलने नांदेडच्या शारदा कंस्ट्रक्शनला आपला बॅचमिक्स प्लॅन्ट विकला कसा, हा महत्वाचा मुद्दा आहे. प्लॅन्टचा हा खरेदी-विक्रीचा व्यवहार कागदोपत्री दाखवून शारदा कंस्ट्रक्शनने संभाव्य कारवाईतून सध्या तरी आपली सुटका करून घेतल्याचे दिसून येते. या सुटकेत पांढरकवडा बांधकाम विभागाची मेहेरबानी कंत्राटदारासाठी तेवढीच महत्वाची ठरली.
वणी-मुकुटबन-पाटण-बोरी या रस्त्याचे आत्तापर्यंत केवळ खडीकरणाचे काम होऊ शकले आहे. या कामावरही अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यामुळे अपघात वाढले आहे. वास्तविक आत्तापर्यंत रस्ता रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्ण होणे बंधनकारक होते. आता पावसाळा तोंडावर असल्याने या मार्गाचे डांबरीकरण केव्हा होणार आणि झाले तरी त्याची गुणवत्ता काय राहणार, हा प्रश्न कायम आहे. प्लँट उभारणीसाठी या कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ दिली गेली होती. वेळेत काम न केल्याने हा कंत्राट रद्द करून फेरनिविदा काढणे किंवा दुसऱ्या क्रमांकावरील स्पर्धक कंत्राटदाराला हे काम सोपविण्याचे पर्याय बांधकाम खात्यापुढे होते. परंतु अद्यापही त्या दृष्टीने कारवाई केली गेलेली नाही. ती टाळण्यासाठीच बॅचमिक्स प्लँटची कागदोपत्री खरेदी दाखविण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Waiting for dacoitization of Wani-Patan road of 18 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.