शनिवारपर्यंत करावी लागणार चिल्लरची प्रतीक्षा
By Admin | Updated: November 18, 2016 02:29 IST2016-11-18T02:29:25+5:302016-11-18T02:29:25+5:30
पाचशे आणि हजार रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आदेशानंतर जिल्ह्यात चांगलीच उलथापालथ झाली आहे.

शनिवारपर्यंत करावी लागणार चिल्लरची प्रतीक्षा
बोटावर लागणार शाई : आठ दिवसांत ३०० कोटींची चेंज खल्लास
यवतमाळ : पाचशे आणि हजार रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आदेशानंतर जिल्ह्यात चांगलीच उलथापालथ झाली आहे. आठ दिवसात तब्बल बाराशे कोटींची उलाढाल झाली आहे. तीनशे कोटींचे चिल्लर चलन बाजारात गेले आहेत. तर त्या ऐवजी नऊशे कोटींचे जुने चलन खात्यात जमा झाले आहे. जमा झालेल्या सहाशे कोटीतून पैसे परत मिळविण्यासाठी ग्राहकांची रेटारेटी सुरू आहे. मात्र आरबीआयकडील चिल्लर नोटा संपल्याने सध्या दोन दिवस जिल्ह्याला प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर नवीन चेंज देताना बोटाला शाई लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी एसबीआयच्या शाखांमध्ये होणार आहे.
जिल्ह्यात २५७ शाखा आहेत. यामध्ये १४३ शाखा राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँकांच्या आहेत. ८९ शाखा सहकारी बँकांच्या आहेत. तर २५ शाखा ग्रामीण बँकेच्या आहेत. जिल्ह्यातील विविध बँकापुढे आठ दिवसांपासून लांबच लांब रांगा आहेत.
एका दिवसाला चार हजार रूपयांच्या नोटा एका व्यक्तीला बदलून देण्याच्या सूचना आहेत. यानुसार जिल्हयात आठ दिवसांमध्ये ३०० कोटींच्या नोटा बदलून ग्राहकांच्या हाती सुपूर्द झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर जुन्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटांच्या माध्यमातून नऊशे कोटी रूपये जमा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आरबीआयकडून मिळणाऱ्या चिल्लर नोटा जिल्ह्यात पोहचण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत. जमा झालेली चिल्लर काही तासातच रिकामी झाल्याने दुपारनंतर एटीएमचे सेटर बंद झाले. तर अनेक बँकाकडील रक्कम दुपारनंतर कमी झाली. यामुळे काही खासगी बँकांना सर्वसामान्याच्या रोषांचा सामना करावा लागत आहे. (शहर वार्ताहर)
गर्दी वाढल्यास तत्काळ कळवा
मंगळवारी पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम संतप्त ग्राहकाने फोडले. यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढील अनर्थ टाळण्यासाठी सर्वच एटीएम धारकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. गर्दी वाढल्यास पोलीस बंदोबस्ताची मागणी पोलीसांकडे करण्याच्या सूचना आहेत. एका व्यक्तीला एकावेळा चार हजार रूपयांची चेंज करता यावी म्हणून बोटाला शाई लावण्याच्या सूचना जिल्ह्यात धडकल्या आहेत.